पहेनी : हिंगोली तालुक्यातील पहेनी येथे लांडग्याने चावा घेऊन दोन शेतकऱ्यांना जखमी केल्याची घटना १७ आॅगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. त्यांच्यावर नर्सी येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.पहेनी शिवारात गावातीलच दत्ता निवृत्ती वैद्य (वय ३0) व वैजापूर येथील पंडिता गाडे (वय ४५) हे डवरणीसाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास विश्रांती घेण्यासाठी त्यांनी काम थांबविले. तर गुरांना बोअरनजीकच्या हौदावर पाणी पाजवण्यास नेत होते. तेव्हा अचानक लांडग्याने हल्ला चढविला. यात वैद्य यांच्या मांडी, पाय व तोंडाला चावा घेतला. तर पंडिता यांच्याही मांडीला चावा घेतला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तरीही लांडगा अंगावर धावून येत होता. त्यानंतर आजूबाजूचे शेतकरी नामदेव शिवाजी इंगोले, बापूराव गाडे, मुरलीधर शेवाळे हे मदतीला धावून आले. त्यांनी लांडग्याला हुसकावले. जखमींना नर्सी नामदेव येथील आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी तर झोपडी व झाडांचा आसरा घेतला. हा लांडगा पिसळला असल्याच्या चर्चेमुळेही यात भर पडली आहे. वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
दोन शेतकऱ्यांना लांडग्याचा चावा
By admin | Updated: August 18, 2014 00:32 IST