वाळूज महानगर : अवघ्या चार महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या लिंक रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडून खडी निखळत असल्यामुळे कामाच्या दर्जाविषयी शंका उपस्थित केली जात आहे. खड्ड्यामुळे वाहनधारकांना आदळआपटीचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वाहनधारकांत नाराजीचा सूर उमटत आहे.रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून औरंगाबाद-नगर रस्ता ते औरंगाबाद - पैठण रस्त्याला जोडणाऱ्या ४़४१ किलोमीटरचा लिंक रोड तयार केला आहे. पूर्वी नगर नाकामार्गे वाहतूक सुरू असल्यामुळे उद्योजक, तसेच वाहनधारकांना शहरात तसेच औद्योगिक क्षेत्रात ये-जा करताना कायम वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत असे. नगर नाका ते गोलवाडी फाटा या रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशी झाली होती. या अरुंद रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने साडेचार किलोमीटरचा लिंक रोड तयार केल्यामुळे नगर नाका-गोलवाडी रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीतून वाहनधारकांची सुटका झालीहोती. चार महिन्यांपूर्वी १० मे रोजी हा लिंक रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा लिंक रोड वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारे उद्योजक, कामगार व वाहनधारकांची गैरसोय दूर झाली होती. याशिवाय मुंबई-नागपूर, तसेच पुणे व अहमदनगरकडून येणाऱ्या वाहनधारकांना बीड, जालना व नागपूरकडे जाण्यासाठी नगर नाका ते बाबा पेट्रोल पंपावरून मारावा लागणारा फेरा वाचला होता.
चार महिन्यांतच ए. एस. क्लब-पैठण लिंक रोडवर खड्डे
By admin | Updated: September 3, 2014 00:26 IST