औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठा गुरुवारी रात्री पुन्हा खंडित झाला. वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळताच गारखेडा परिसर, सातारा-देवळाई, हडको, औरंगपुरा, नंदनवन कॉलनी आदी भागांतील वसाहती अंधारात बुडल्या. काही भागात अर्धा तास तर काही भागात तासभर वीज गुल राहिली. दोन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला. मंगळवारी रात्री निम्मे शहर तब्बल एक ते दीड तास अंधारात बुडाले होते. त्यानंतर आज रात्रीही शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी अचानक वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. पावसाचा थोडा शिडकावाही झाला. त्यामुळे थोड्याच वेळात गारखेडा, सूतगिरणी चौक, शिवाजीनगर, सातारा, देवळाई, हडकोतील काही वसाहती तसेच औरंगपुरा, रेल्वेस्टेशन, नंदनवन कॉलनी आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. सातारा-देवळाई आणि हडकोतील वसाहतींमध्ये अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. शहरातील मध्यवर्ती भागातील वसाहतींमध्ये मात्र, काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. गारखेड्यातील वसाहतींमध्ये अर्धा ते पाऊण तास वीज नव्हती.
वादळी वारे सुटताच वीज गुल
By admin | Updated: May 21, 2016 00:11 IST