पंकज जैस्वाल ,लातूरलातूर जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा आशिर्वाद नसतानाही राजरोस मटका सुरू आहे. दिवसाकाठी सुमारे २५ लाखांची उलाढाल होत असतानाही पोलिसांकडून कारवाई मात्र शून्य आहे. त्यामुळे या जुगाराला अभय कोणाचे? असा सवाल उपस्थित होत आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी मटका सुरू आहे. मोबाईलवर संपर्क साधून नेहमीचे ‘खेळाडू’ आकडे लावतात. त्यातून आर्थिक उलाढालही होत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण लातूरला रूजू होताच सुरुवातीचे काही दिवस मटका चालकांविरुद्ध धडाकेबाज कारवाया करण्यात आल्या. औराद शहाजानी व अन्य एका ठिकाणी सुमारे लाख रुपयांचा मटका पकडण्यात आला. जिल्ह्यात अन्यत्रही मटक्याचे धाडसत्र सुरू राहिले. त्यानंतर काय गौडबंगाल झाले, मटका सुरू असला तरी पोलिसांच्या हाती मटका खेळविणारे मात्र सापडत नसल्याचे चित्र आहे. लातूर शहरातील पोलिस अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता आपल्या हद्दीमध्ये मटका सुरू नसल्याचे ते सांगत आहेत. एका-एका तालुक्यात सुमारे ३० ते ४० मटका एजंट सक्रीय असून, जिल्ह्यातील दहा तालुके आणि लातूर शहरासह सुमारे १२०० एजंट या मटका व्यवसायात गुंतलेले आहेत. मटका खेळणाऱ्यांकडे त्यांचे नंबर्स सहज उपलब्ध होतात. त्या-त्या बीट अंमलदारालाही हे एजंट कोठे बसतात, याची माहिती आहे. पोलिसांनी सतर्क राहिल्यास एजंट व मटका बुकींपर्यंत पोहोचणे सहज शक्य असते. त्यांची नेहमीची ठिकाणे माहीत असतात. परंतु, त्याकडे डोळेझाक केली जात असल्याचे नागरिकांतून बोलले जाते.पोलिसांकडून डोळेझाक असल्यामुळे जिल्ह्यात मटका जोमात सुरू आहे. मटका खेळणाऱ्यांना सहजपणे उपलब्ध होणारा एजंट व मटका बुकी पोलिसांना मात्र सापडत नसल्याचे आश्चर्य आहे. यामध्ये ‘अर्थ’कारण असण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची प्रतिक्रिया ह्युमन राईट संघटनेचे प्रशासकीय संचालक रामेश्वर धुमाळ यांनी दिली. ४लातूर जिल्ह्यात राजरोस मटका सुरू आहे. या मटका चालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे. ज्या ठिकाणी मटका चालतो, तेथे प्रतिबंध लागू करणे आवश्यक आहे. शिवाय, मटका एजंटांवर जुजबीऐवजी कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत शिवराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष अॅड. निलेश करमुडी यांनी व्यक्त केले. ४पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून मटका एजंट व बुकींवर कारवाई केली पाहिजे. त्यांचे मोबाईलमधील कॉल डिटेल्स तपासून मटका खेळणाऱ्यांवरही कारवाई केली पाहिजे. मोबाईल मटका रोखण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिसांनी नियोजन करावे, अशी प्रतिक्रिया शहर युवक काँग्रेसचे सचिव जावेद मणियार यांनी दिली.
मटक्याला अभय कोणाचे?
By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST