गारज : वैजापूर तालुक्यातील शिवगाव पाटीजवळील पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र असलेल्या व्हाइट लोटस जिनिंगमध्ये गुरुवारी (दि.३१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत शेतकऱ्यांचा खरेदी करून ठेवलेला अंदाजे एक हजार क्विंटलपेक्षा जास्त कापूस जळून खाक झाला आहे.
जिनिंगमध्ये आग विझविण्यासाठीच कुठलीही व्यवस्था नव्हती, तसेच पाणीही उपलब्ध नव्हते यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जिनिंगमध्ये कापूस वाहतूक करण्यासाठी जेसीबीचा वापर होत होता. जेसीबीचे सायलेन्सर गरम होऊन कापसाने आग पकडल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याबरोबर आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठल्याही प्रकारची यंत्रणा जिनिंगमध्ये उपलब्ध नसल्याने आग भडकत गेली. अग्निशमन बंबाला पाचारण करेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि सत्यजित ताईतवाले यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. जिनिंगच्या परिसरात कापूस गाठी, कापूस मोठ्या प्रमाणावर असल्याने या आगीत सुमारे एक हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
चौकट
दीड तास उलटूनही पोहोचली नाही यंत्रणा
जिनिंगमध्ये आग लागल्यानंतर आग विझविण्याची कोणतीही व्यवस्था तेथे नव्हती. यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. येथील कामगार एक एक इंच नळीच्या साहाय्याने पाणी टाकून आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते. दीड तास उलटूनही अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याने या आगीत संपूर्ण कापूस जळून खाक झाला.
चौकट
गाड्या काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
जिनिंगमध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला आणला होता. आग लागताच कापसाच्या गाड्या काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली. प्रत्येकजण आपले वाहन बाहेर काढण्यासाठी धडपडत होता. यामुळे तेथे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
फोटो कॅप्शन : वैजापूर तालुक्यातील शिवगाव पाटी येथील जिनिंगला आग लागून सुमारे एक हजार क्विंटल कापूस भस्मसात झाला.