औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगवर बंदी घातली आहे. शहरात प्रतिबंधित कॅरिबॅगचा वापर १०० टक्के बंद व्हावा, या उद्देशाने महापालिका प्रशासन जोरदार प्रयत्न करीत आहे. तरीही प्रशासनाला यश येत नाही. शहरात चोरट्या मार्गाने लाखो रुपयांचे कॅरकबॅग दाखल होत आहेत. छावणी आणि वाळूज येथे कॅरकबॅग साठवून ठेवण्यात येतात. तेथून दुचाकी वाहनांद्वारे शहरात वाटपाचे काम केले जाते.
शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचा वापर होऊ नये यासाठी मनपाने स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाकडून दररोज किमान चार ते पाच व्यापाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येते. तसेच प्रत्येक व्यापाऱ्याला प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारण्यात येतो. यानंतरही व्यापारी आणि छोटे छोटे व्यावसायिक प्रतिबंधित कॅरिबॅगचा राजरोसपणे वापर करीत आहेत.''लोकमत'' ने शहरात कॅरिबॅग नेमके येतात कोठून, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील कॅरिबॅग विक्रेते ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचा माल ठेवायला तयार नाहीत. मग सर्वसामान्य व्यापाऱ्यांकडे कॅरिबॅग कशा पद्धतीने पोहोचतात? यासंदर्भात महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, आतापर्यंत किमान पाचशे ते सहाशे व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ३० लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला. कॅरिबॅगचा साठा सापडलेल्या दोन व्यापाऱ्यांवर आतापर्यंत फौजदारी गुन्हे दाखल झाले. व्यापाऱ्यांना वारंवार सूचना दिल्यानंतरही प्रतिबंधित कॅरिबॅगचा वापर करीतच आहेत.
गुजरातहून थेट माल येतो
गुजरातेत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित कॅरिबॅगचे उत्पादन होते. औरंगाबादेत छावणी आणि वाळूज येथे काही गोदामांमध्ये हा माल ठेवण्यात येतो. दुचाकी वाहनांवरून हळूहळू हा माल शहरात आणल्या जातो. पूर्वी दुकानांमध्ये हा माल विकल्या जात होता. कॅरिबॅगच्या व्यवसायात उतरलेल्या माफियांनी आता विक्रीची पद्धत बदलली आहे.
शहरातील कचऱ्यात सर्वाधिक कॅरिबॅगच
शहरातील कचरा संकलन केल्यानंतर तो प्रक्रियेसाठी चिकलठाणा आणि पडेगाव येथील केंद्रावर नेण्यात येतो. या कचऱ्यात सर्वाधिक प्रतिबंधित कॅरिबॅग आढळून येतात. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करताना बराच त्रास होतो. शहरातील नाल्यांमध्येही कॅरिबॅग मोठ्या प्रमाणात आढळून येतात.