घाटनांद्रा : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. यापूर्वी कधीही विचारपूस न करणारे आता बाहेरगावी राहणाऱ्या गावातील मतदारांना दररोज फोन करुन ताई, माई, अक्का, काका, भाऊ, मामा, मामी गावाकडे कधी येणार, या बरं का, मी उभा आहे. असे म्हणून विणवण्या करताना दिसत आहेत. अनेकजणांना आता नातेवाईक मित्रमंडळी आठवत असून फोनवरूनच नातेसंबंधांना उजाळा देण्यात येत आहे.
घाटनांद्रा परिसरात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदानप्रक्रिया १५ जानेवारीला पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावर्षी शासनाने जरी निवडणुकीच्या निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याचे सांगितले असले तरी मीच सरपंच होणार अशा आविर्भावात अनेकजण वावरू लागले आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक ही गावपातळीवरील मोठ्या प्रतिष्ठेची मानली जाते. भविष्यात जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची पूर्वतयारी म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जाऊ लागले आहे. गावातील बहुतांश नागरिक हे पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव आदी शहरांच्या ठिकाणी नोकरी किंवा रोजगाराच्या निमित्ताने गेलेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक मोठी अटीतटीची होते. त्यामुळे प्रत्येक मतदार महत्त्वाचा मानला जातो. शहराकडे गेलेले मतदार मतदानासाठी गावाकडे यावेत तसेच त्यांची मते आपल्याला मिळावीत याकरिता उमेदवार आटापिटा करीत आहेत. कधीही विचारपूस न करणारेही आता फोन करून मतदानाला या असे म्हणत असल्याने मतदारांची चांगलीच गोची होत आहे. मात्र, मतदार मतदानाला येणार की, नाही हे १५ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
चौकट
भाडे व खर्चाची चिंता करू नका
ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेले उमेदवार निवडून येण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. बाहेरगावी असलेल्या आपल्या वॉर्डातील उमेदवारांना फोन करून ख्यालीखुशाली विचारण्यासह मतदानाला येण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच येण्या-जाण्याच्या खर्चाची चिंता करू नका, असे आश्वासन दिल जात आहे.