- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)
औरंगाबाद येथील बाजारपेठेत किमान २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने गव्हाची खरेदी करावी लागणार आहे. गव्हाचे वाढलेले दर हा एक उच्चांक आहे, असे मानले जाते. औरंगाबादेत परराज्यातून येणाऱ्या गव्हात ७० टक्के मध्यप्रदेशातून येतो. अन्य २० टक्के गहू राजस्थान, गुजरातहून येत असतो, तर १० टक्के गहू स्थानिक बाजारातून येतो. यंदा मध्यप्रदेशातील बहुतांश गहू तेथील सरकारने खरेदी केला. यामुळे व्यापाऱ्यांकडे कमी प्रमाणात गहू आहे.
दर महिन्याला राज्य सरकार गव्हाचे टेंडर काढत असते. क्विंटलमागे ५० ते ६० रुपयांनी जास्तीची बोली लावून राजस्थानमधील व्यापाऱ्यांनी गहू खरेदी केल्याने तोच गहू औरंगाबादेत विक्रीसाठी येणार आहे. मात्र, टेंडर उंच गेल्याने येथे स्थानिक बाजारपेठेत ५० ते ६० रुपयांनी गहू महागला. २४०० ते २८०० पर्यंत जाऊन गहू पोहोचला. मागील आठवड्यात बाजारी व ज्वारीचे भाव स्थिर होते. कारण, एवढ्या उंच भावातून खरेदीतून ग्राहकांनी हात आखडता घेतला. आटा, रवा, मैदा बनविणाऱ्या मिलवाल्यांकडून गव्हाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने व्यापारी उंच भावात टेंडर घेत असल्याची माहिती होलसेल व्यापारी नीलेश सोमाणी यांनी दिली.
मागील महिनाभरापासून जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक सुरू झाली. मात्र, मागील वर्षीपेक्षा यंदा ६० टक्के उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम आवकवर झाला. जिथे या काळकत दररोज ४ ते ५ हजार क्विंटल मक्याची आवक होते, तिथे केवळ ८०० ते १ हजार क्विंटलदरम्यान मका येत आहे. आवक घटल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मक्याचे भाव १५० ते ३०० रुपयांनी वाढून सध्या १०५५ ते १३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. केंद्र सरकारने मक्याला १७०० रुपये हमीभाव जाहीर केला. अडत व्यापारी कन्हैयालाल जैस्वाल म्हणाले की, आॅक्टोबर ते मार्च हा मक्याचा काळ असतो.