औरंगाबाद : दिवाळीत औरंगाबादकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी मनपा प्रशासन गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून २४ तासांचे शटडाऊन घेणार आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान पाच दिवसांचा अवधी लागणार आहे. मनपाने शटडाऊनची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती.तीन महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा नेमका कोणाकडे आहे, हेच कळायला मार्ग नाही. समांतर जलवाहिनीच्या ठेक्याचा वाद न्यायालयात सुरू आहे. आज पाणीपुरवठा कंपनीकडे तर दुसऱ्या दिवशी मनपाकडे असतो. कंपनी व मनपाच्या भांडणात सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक वसाहतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनेक वसाहतींना नियोजित वेळी आणि नियोजित दिवशी पाणीच मिळायला तयार नाही. वेदांतनगर, ज्युबिली पार्क, मोंढानाका येथे मोठे लिकेज निर्माण झाले आहेत. दुरुस्तीचे काम मनपा आणि कंपनी करायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी सिडको-हडकोतील नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन दिवाळीत तरी पाणीपुरवठा सुरळीत ठेवा, अशी मागणी केली. त्यानंतर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पाणीपुरवठ्यात लक्ष घालणे सुरू केले. दिवाळीत पाणीपुरवठ्याची एकही तक्रार येणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
५ दिवस पाण्याचा ठणठणाट
By admin | Updated: October 20, 2016 01:43 IST