घोषणांचा पाऊस : उपाययोजनाही कागदावरनांदेड : विष्णूपुरीतील पाणीपातळी खालावल्याने दक्षिण नांदेड भागावरील जलसंकट तीव्र झाले असून आता आपातकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने तयारीला लागण्याचे आदेश प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले आहेत़ त्याचवेळी महापालिकेचे पदाधिकारी मात्र विष्णूपुरीचे दौरे करीत घोषणाबाजीच करीत आहेत़महापालिका हद्दीत विष्णूपुरी आणि पर्यायी पाणीपुरवठा योजना असलेल्या आसना नदीतून पाणी पुरवले जात आहे़ इसापूर प्रकल्पात पाणी राखीव ठेवल्याने आणि पर्यायी योजना वेळीच कार्यान्वित केल्याने उत्तर नांदेडातील पाणीप्रश्न सध्यातरी उद्भवला नाही़ त्याचवेळी विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला जवळपास ३० टक्के शहराला पाणीपुरवठा केला जातो़ त्यात सिडको, हडको, वसरणी, कौठासह जुन्या नांदेडातील काही भागांचाही समावेश आहे़ विष्णूपुरीतील जिवंत जलसाठा संपल्याने सध्या मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे़ या मृत जलसाठ्यातून दक्षिण नांदेडची १५ ते २० दिवस तहान भागू शकणार आहे़ त्यात मान्सूनचे आगमन वेळेत झाले नाहीतर मोठे जलसंकट उद्भवणार आहे़ या जलसंकटाची कल्पना असूनही महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या वादामुळे कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत़ आता जलसंकट तोंडावर आले असताना उपाययोजना आखण्यात येत आहेत़ त्यातही अपुऱ्या माहितीच्या आधारे जलसंकट निवारण्याचा प्रयत्न केला जात आहे़ ही परिस्थिती ओळखून महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी काकाणी यांनी पाणीपुरवठा विभागाला गांभीर्याने काम करण्याचे आदेश दिले आहेत़ विष्णूपुरीतील जलसाठा संपल्यास आपातकालीन परिस्थितीत महापालिका हद्दीतील विहिरी, बोअरचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत़ या विहिरी स्वच्छ करून तसेच बंद पडलेले बोअर सुरू करावेत असेही ते म्हणाले़ वेळ पडल्यास महापालिका खाजगी बोअर, विहिरीही ताब्यात घेवून पाणीपुरवठा करू शकते़ यासाठी खाजगी विहिरी व बोअरचेही सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले़ प्रभारी आयुक्तांनी केलेल्या सूचना पाहता जलसंकटाचे गांभीर्य पुढे येत आहे़महापालिकेच्या पर्यायी पाणीपुरवठा योजना अर्थात आसना नदीवरून कोटीतीर्थपर्यंत पाणी नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत प्रस्ताव सादर करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत़ जवळपास ६ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता़ तो नव्याने पाठविण्यात येणार आहे़
जलसंकट तीव्र
By admin | Updated: May 17, 2016 00:03 IST