औरंगाबाद : जायकवाडी धरणातील ढाकेफळच्या बाजूने ‘बॅकवॉटर’लगत ३० फूट खोल ‘चर’ खोदणारे बडे शेतकरी आणि संजीवनी उपसा जलसिंचन योजनेच्या संचालक मंडळाविरोधात पाटबंधारे विभागाने पोलिसांत तक्रार देऊनही अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. जायकवाडीच्या पाण्यावर कुणीही डाका टाकावा व मोकाट अभय मिळवावे, असाच हा प्रकार असून महसूल, पोलीस, सिंचन, पाटबंधारे, वन विभाग एकमेकांच्या कोर्टात कारवाईचा चेंडू टोलवीत आहेत. वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूलकडून कारवाई होते. पोलीसही तातडीने पुढे येतात. पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर कारवाई होते. मग जायकवाडीच्या पाण्यावर डाका टाकणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न आहे. जायकवाडीच्या बॅकवॉटरच्या दिशेने पक्षी अभयारण्य घोषित आहे. ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून तो परिसर घोषित करण्यात आलेला आहे. असे असतानाही ढाकेफळजवळ चर खोदण्यासाठी स्फोटके वापरली गेली. पोकलेनच्या साह्याने चर खोदण्याचे काम दिवसाढवळ्या सुरू होते. त्या चरामधून बॅकवॉटरची चोरी सुरू झाली असती तर जायकवाडीतील बहुतांश योजनांचा पाणीपुरवठा धोक्यात आलाअसता. सुभेदारी विश्रामगृह येथे सोमवारी खा.चंद्रकांत खैरे यांनी घेतलेल्या बैठकीला उपविभागीय अधिकारी केशव नेटके, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता पोकळे, कार्यकारी अभियंता एस. ई.भर्गाेदेव, वनाधिकारी, मनपा अधिकारी उपस्थित होते.