उस्मानाबाद : शहरानजीकच्या हलताई डोंगराजवळील साठवण तलावात असलेल्या एक्सप्रेस फिडरला वीज कंपनीकडून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़ त्यामुळे शहरातील अनेक भागाला १० ते १२ दिवसाला पाणी मिळत असल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे़गत काही दिवसांपासून हतलाई डोंगरानजीकच्या एक्सप्रेस फिडरला कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे़ सकाळपासून सायंकाळपर्यंत कमी दाबाने वीजपुरवठा असल्याने पालिकेला मोटार लावून पाणी उपसण्यास अडचणी निर्माण होत आहेत़ रात्रीच्यावेळेस काही तास पाणी उपसा करून तेरणा जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत नेण्यात येत आहे़ मात्र, कमी दाबामुळे अपेक्षित प्रमाणात पाणीउपसा होत नाही़ त्यामुळे शहरात आठ-दहा दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्याचा परिणाम शहरातील नागरिकांवर पडत असून, प्रसंगी इतरत्र ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे़ त्यातच खांडवी नजीकही सतत कोणती न कोणती अडचण निर्माण होत आहे़ या अडचणींमुळे शहरातील पाणीपुरवठ्यावरच विपरित परिणाम पडत आहे़ त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देवून शहरात सुरळीत पाणीपुरवठा कराण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासियांतून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)शहरानजीकच्या हतलादेवी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एक्सप्रेस फिडरवर कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे़ कमी दाबाची वीज असल्याने विद्युत मोटार सुरू होत नाही़ त्यामुळे पाणीउपसा कमी प्रमाणात होत आहे़ रूईभर येथेही अशीच अडचण निर्माण होताना दिसत आहे़ एक्सप्रेस फिडरवर सुरळीत वीजपुरवठा करावा, यासाठी वीज कंपनीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे़ रात्रीच्यावेळी पाणीउपसा करून शहरात पाणीपुरवठा करण्यात येत असून, वेळेवर पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न असल्याचे पाणीपुरवठा सभापती आबा इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
कमी दाबाच्या विजेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत
By admin | Updated: November 16, 2014 23:38 IST