औंढा नागनाथ : तालुक्यातील २२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पंचायत समितीकडे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यापैकी १० गावांमध्ये प्रशासनाने विहीर व बोअरचे अधिग्रहन केले आहे; परंतु ११ गावे अजूनही तहानलेली असून अधिग्रहणासाठी प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांची पाहणी करण्यात येत आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळखोपा, रुपूर तांडा, देवाळा या ठिकाणी दोन महिन्यापूर्वीच विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यानंतर दुधाळा, दुधाळा तांडा, हिवरा जाटू, काठोडा तांडा, काकडदाभा, फुलदाभा, तुर्कपिंप्री या गावांमध्ये पाण्यासाठी विहीर अधिग्रहण करण्यात आले; परंतु त्याचप्रमाणे जलालपूर, वगरवाडी, शिरडशहापूर, पिंपळदरी, वगरवाडीतांडा, देवाळा तर्फे लाख, चोंढी शहापूर, गढाळा, मेथा, बैनाराव सावळी, सावळी तांडा, सिद्धेश्वर तांडा या ग्रामपंचायतींनी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यासंदर्भात पंचायत समितीत हे प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविले आहेत. त्या नुसार औंढा येथील तहसीलदार श्याम मदनुरकर हे गावांची पाहणी करताना दिसून येत आहेत. जून संपला तरी पाऊस न पडल्याने ही स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती अशीच राहिल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. (वार्ताहर)
औंढा तालुक्यातील २२ गावांत पाणीटंचाई
By admin | Updated: July 7, 2014 00:32 IST