नांदेड: पोळ्यानंतर सुरु झालेल्या पावसाने गणेशोत्सव स्थापनेपासून विसर्जनापर्यंत दमदार हजेरी लावल्याने कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे विहिरी-बोअरमधील पाणीपातळी वाढल्याने बळीराजा सुखावला असून नागरिक तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी सुटला आहे.यावर्षी मृग नक्षत्र सुरु होऊन दोन - अडीच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पावसाने विश्रांतीच घेतली होती, यामुळे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मोठे पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले होते. शिवाय जनावरांच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचाही मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकला होता. तसेच शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी करुनही पाण्याअभावी हजारो हेक्टरवरील पिके मातीत गेली. यामुळे सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यानंतर पोळ््याच्या पूुर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली गणेशोत्सवाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत निसर्गाने कृपा केल्याने जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले आहे.पाऊसच नसल्याने विहिरी-बोअरमधील पाणीपातळी कमालीची खालावली होती, तर काही भागातील विहिरी-बोअर, हातपंप कोरडेठाक पडल्याने जिल्ह्यात टँकरची संख्याही वाढली होती. मात्र गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने विहिरी-बोअरमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक भागातील विहिरी काठोकाठ भरल्यामुळे तसेच विष्णूपुरीसह इतर भागातील छोटे-मोठे प्रकल्प भरल्याने दोन महिन्यांपासून चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. जिल्ह्यातील काही भागातील खरीप हंगाम हातचा गेला असला तरी भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे तसेच प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर पुढचा रबीचा हंगाम तरी पदरात पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. (प्रतिनिधी)
विहिरींच्या पाणीपातळीत वाढ
By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST