खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शिवपूर वस्तीत पंधरा दिवसांपासून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे रहिवाशांना भटकंती करावी लागत असून, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर घागरमोर्चा काढण्यात आला. खामसवाडी गावच्या पाणीपुरवठ्यासाठी जुनी एक टाकी आणि दोन विहिरी उपलब्ध आहेत. परंतु, वाढती लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध स्त्रोत अपुरे पडत असल्याने येथे नव्वद लाख रुपये खर्चून जलस्वराज योजना राबविण्यात आली. यातून शिवपूर येथे स्वतंत्र टाकी बांधण्यात आली. सध्या येथे पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे या भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. पाणीटंचाईला कंटाळून शनिवारी या भागातील महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी सरपंच सुमन कोकणे यांनी दोन दिवसात जलवाहिनीची दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)
पाण्यासाठी घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 23:37 IST