बीड : गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात अवर्षणाची स्थिती आहे. पावसाचे पाणी जतन करण्यासाठी शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारणाची भौतिक उपचार पद्धती करून याची प्रात्यक्षिके पेरणी दरम्यान राबविल्यास जलसंधारणाचा फायदा होणार आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रावर पाण्याची उपलब्धता जास्तीत जास्त टिकून राहण्यास मदत होणार आहे. पावसावर अवलंबून असणारी पिके व विविध प्रकारची झाडे, वनस्पती वाढीसाठी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून वनस्पतीच्या मुळाशी पुरवून पिके वाढविण्यासाठी त्याचा वापर करून उत्पादनासाठी उपयोग होणार आहे. परतीच्या पावसाचे मूलस्थानी जलसंधारण केल्यास जमिनीची ३० ते ४० टक्के धूप थांबते. १७ ते ३४ टक्क्याने उत्पादनात वाढ होते. कापसासारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांकरिता ही पद्धत उपयोगी आहे. पावसाळ्याच्या शेवटी ओलाव्याची शाश्वती वाढून मूलस्थानी जलसंधारणामुळे ओलावा टिकून राहतो. तसेच जमिनीची पाणी धारण क्षमता वाढून निचरा होतो. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने, कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड, एस. व्ही. तळेकर, कीड नियंत्रक संतोष घसिंग यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
गरज मूलस्थानी जलसंधारणाची
By admin | Updated: September 9, 2015 00:04 IST