जालना : जायकवाडी पाणी योजनेच्या पैठण ते पाचोड दरम्यान नानेगाव व लिंबगाव फाट्यावरील व्हॉल्व्हमधून पाणी चोरी करणाऱ्या चार शेतकऱ्यांविरुद्ध मंगळवारी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.जालना नगर पालिकेने सदर जलवाहिनीतून चोरी होत असल्याची तक्रार केली होती. १३ जून रोजी लोकमतने सदर वृत्त प्रकाशित करताच नगर पालिका प्रशासनाने तक्रार दाखल केली. जायकवाडी ते जालना जलवाहिनीतून दहा एमएलडी पाणीचोरी होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांसह स्थानिक प्रशासनास अपयश आले होते. पैठणच्या जायकवाडी धरणातून जालन्यासाठी दररोज २७ एमएलडी पाणी सोडले जाते. त्यातून दोन एमएलडी पाणी हे अंबडला पुरविले जाते. मात्र, पैठण ते पाचोड दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी पाणीचोरी सुरु केलेली आहे. १२ व १३ जून दरम्यान नानेगाव फाट्याजवळ जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची नासधूस नानेगाव फाटा येथून पाणी चोरी करणाऱ्या सुंदर शिवराम काळे, मोबीन टेलर, लिंबगाव फाटा येथील बबनराव कर्डिले व हर्षी येथील संतोष चंद्रभान आगळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पाणीचोरी; चार शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: June 16, 2016 00:04 IST