औरंगाबाद : पावसाअभावी जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. आठवड्यात अनेक नवीन गावे टंचाईच्या फेऱ्यात आली आहेत. जिल्ह्यातील २२० गावे आणि वाड्यांना ३१६ टँकरने पाणी पुरविले जात आहे. खुलताबाद वगळता सर्व ८ तालुक्यांत टँकर सुरू आहेत. जानेवारीपासून यंदा जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई आहे. मे महिन्यात ती तीव्र झाली. नंतर आता पाऊस लांबल्यामुळे या टंचाईने आणखीच भीषण रूप धारण केले आहे. मेअखेरीस जिल्ह्यात १५० पेक्षा जास्त गावे टंचाईग्रस्त झाली. पूर्ण जून महिना पावसाविना गेल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. विशेषत: औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर आणि फुलंब्री तालुक्यांना टंचाईची सर्वाधिक झळ बसली आहे. या पाच तालुक्यांमध्येच ३०० हून अधिक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २२० गावांना ३१६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पैठण तालुक्यातील ६८ गावांना १०१ टँकरने पाणी पुरविले जात आहे. खुलताबाद तालुक्यात मात्र अद्याप एकही टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही. २५० गावांत ३१३ विहिरी अधिग्रहित- जिल्ह्यात खाजगी विहिरी अधिग्रहित करूनही पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशासनाने सध्या २५४ गावांमध्ये ३१७ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यापैकी ९६ विहिरींवरून टँकर भरले जात आहेत. उर्वरित २२१ विहिरींमधून मात्र, त्याच परिसरातील लोकांना पाणी उपलब्ध करून दिले गेले आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक ७८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गंगापूर तालुक्यात ५१, पैठण तालुक्यात ४०, औरंगाबाद तालुक्यात ३७, कन्नड तालुक्यात ३७, सिल्लोड तालुक्यात ५५, सोयगाव तालुक्यात २ आणि खुलताबाद तालुक्यात ३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
२२० गावांना ३१६ टँकरने पाणी
By admin | Updated: July 14, 2014 01:04 IST