जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या हेतूने कृतीशिल आहेत. राज्यातील देवस्थाने, पवित्र नद्या, यांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. ५ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या पर्यावरण दिन व लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित पर्यावरण सप्ताहाचे औचित्य साधून शासन व उद्योगपतींच्या सहभागातून जालना शहर व कुंडलिका नदी परिसरातील एक कोटी निरुपयोगी पाणी एकत्र करुन त्यावर प्रक्रि या करुन ते पाणी ग्रामीण भागातील शेतीला वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी व शासकीय विश्रामगृह ४८८ येथे शहरातील सांडपाणी प्रक्रिया व व्यवस्थापन याबाबत उद्योगपती व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधींची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, उद्योगपती राम भोगले, विवेक देशपांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, विलास नाईक, भाऊसाहेब कदम, गोपाळराव बोराडे, घनश्याम गोयल, सुनिल रायठठ्ठा, किशोर अग्रवाल, विरेंद्र धोका उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शहरातील प्रक्रिया केलेले सांडपाणी परिसरातील व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपयुक्त असून, अशा प्रकारचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी तात्काळ जिल्हाधिकारी यांना याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत राम भोगले यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
सांडपाणी प्रक्रिया शेतीसाठी वरदान ठरेल
By admin | Updated: June 5, 2016 00:34 IST