औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या परतीच्या पावसाने रविवारी शहरास जोरदार तडाखा दिला. विजांच्या कडकडाटांसह शहर आणि परिसरात तासभर धोऽऽऽ धो पाऊस बरसला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. चिकलठाणा वेधशाळेत १८.४ मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे उल्कानगरीत एक झाड उन्मळून पडले. जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. तेव्हापासून अधूनमधून पाऊस पडत आहे. रविवारी सायंकाळी आकाशात ढगांची एकच गर्दी झाली. त्यामुळे सर्वत्र अंधार पसरला. काही वेळातच धोऽऽ धो पावसाला सुरुवात झाली. सोबत विजांही चमकत होत्या. सुमारे तासभर धोऽऽ धो पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. औरंगपुरा, सिडको, हडको, गारखेडा परिसर, सातारा, देवळाई, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, पैठण रोड, कांचनवाडी अशा सर्वच भागांत पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील नाल्यांना पूर आला होता. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्यांवरही पाणी साचले होते. पाऊस सुरू असतानाच उल्कानगरी भागात कासलीवाल अपार्टमेंटशेजारी एक झाड उन्मळून पडले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन झाड बाजूला केले. चिकलठाणा वेधशाळेत रात्री ८ वाजेपर्यंत १८.४ मि. मी. पावसाची नोंद झाली. सायंकाळच्या दमदार पावसानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. दुसरीकडे पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. सातारा, देवळाई भागातील काही वसाहतींमधील वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त वेळ लागला.वीज पडून शेतकरी ठारपाचोड/कडेठाण : पैठण तालुक्यातील सुलतानपूर शिवारात शेतात काम करीत असताना वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२) घडली.सुलतानपूर शिवारात शिवाजी हिरामण दौंड हा शेतकरी पत्नीसह गट नंबर ४३ मधील शेतात काम करीत असताना दुपारी ३.४५ वाजता अचानक वीज कोसळून सदर शेतकरी गंभीर जखमी झाला. यानंतर खादगावचे सरपंच शिवाजी काकडे, बाळासाहेब दौंड, संजय दौंड, दत्तात्रय पालवे आदी उपचारासाठी शेतकऱ्याला घेऊन औरंगाबादेला जात असताना रस्त्यातच या शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती सरपंच काकडे यांनी तातडीने पाचोड पोलिसांना दिली. त्वरित पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि. महेश आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिवरा नदीच्या पुरामुळे बनोटीचा संपर्क तुटलाबनोटी : परिसरात रविवारी (दि.२) दिवसभर झालेल्या पावसामुळे हिवरा नदीला पूर येऊन जवळपास ४ तास बनोटीचा संपर्क तुटला होता. या पावसामुळे परिसरातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत होेते. येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परतीचा पाऊस बनोटी परिसरावर मेहेरबान झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात तळ गाठलेले येथील अनेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहत आहेत. त्यातच रविवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नायगाव, मुखेड, हनुमंतखेडा, बोरमाळ, वरठाण, किन्ही येथील नदी, नाल्यांना पूर आल्याने परिसराचा काही वेळासाठी संपर्क तुटला आहे. घोसला नदीला आलेल्या पुरामुळे सोयगाव रस्त्यावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद होती. बनोटी गावाच्या मध्यातून वाहणाऱ्या हिवरा नदीला पावसाळ्यातील पहिला पूर आल्याने नदीथडीला ग्रामस्थांनी पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पाणीपातळी वाढतच गेल्याने येथील रविवारच्या आठवडी बाजारावरही पावसाचा परिणाम जाणवला. परिसरातील शेतांमध्ये जिकडेतिकडे पाणी तुंबले होते. पीरबावडा, वडोदबाजार परिसरात जोरदार पाऊसवडोदबाजार (ता. फुलंब्री) परिसरात रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांमध्ये जिकडेतिकडे पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिरबावडा (ता. फुलंब्री) परिसरात रविवारी (दि.२) दुपारी ३ ते ४ दरम्यान जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहिले. गावातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्यामुळे जिकडे तिकडे चिखल झाला होता. वाहतूक विस्कळीतबीडमधील मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर मार्गावरील ‘एसटी’ची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ४पावसामुळे या मार्गावरील बीडजवळील पूल वाहतुकीसाठी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद करण्यात आला.४ लातूर, सोलापूरकडून, तुळजापूरकडून येणाऱ्या एसटी बसेस मांजरसुंबा येथे तर लातूर, सोलापूरकडे जाणाऱ्या बसेस बीडमध्ये थांबविण्यात आल्या. ४उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, लातूरकडे ‘एसटी’ने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. पावसामुळे या दोन्ही ठिकाणी शेकडो प्रवासी अडकून पडले.४पावसामुळे ‘एसटी’मध्ये बसून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. ४जोरदार पावसामुळे बीड येथील पूल वाहतुकीसाठी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद होता. ४पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे औरंगाबादमधून सोलापूर, लातूरकडे जाणाऱ्या बसेस बीडमध्ये थांबविण्यात आल्या.४दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक ए. यू. पठाण यांनी दिली.
विजांच्या कडकडाटासह धोऽऽऽ धो पाऊस
By admin | Updated: October 3, 2016 00:32 IST