वसमत: तालुक्यातील वाखारी येथील आरोग्य उपकेंद्र सदैव कुलूपबंदच असते. गावातील रूग्णांना या उपकेंद्रात ना उपचार मिळतो ना तपासणी होते. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने ग्रामस्थांच्या आरोग्याचे हाल होत असल्याचे चित्र आहे. वसमत तालुका आरोग्य विभागाचा गलथान कारभार वाढला आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. वसमत तालुक्यातील वाखारी येथील आरोग्य केंद्राची अवस्था तर दयनीय आहे. येथे एकही कर्मचारी फिरकत नाही. उपकेंद्राचे कुलूप फक्त लसीकरण करण्यासाठीच उघडल्या जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. आजारी पडलेल्या ग्रामस्थास औषधी व गोळीही येथे मिळत नसल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली. वाखारी येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रसुतीगृहाचेही बांधकाम झाले आहे. मात्र या प्रसुतीगृहाचेही कुलूप आजवर उघडले गेलेले नसल्याची गंभीर तक्रार आहे. त्यामुळे येथे प्रसुती किती झाल्या असतील, हा शोधाचाच विषय आहे. परिचारिका, आरोग्य सेवकच उपकेंद्राकडे फिरकत नसल्याने वैद्यकीय अधिकारी दिसण्याचाही प्रश्न नाही. केवळ कागदोपत्री उपचार व उपाययोजनावर कामकाज ढकलत चालले आहे. गावात कोणी आजारी पडले तर त्यास या उपकेंद्रातून काही सुविधा मिळेल, याची आशाही ग्रामस्थांना नसल्याने ते सरळ खासगी डॉक्टर किंवा वसमत गाठत असतात. हयातनगर उपकेंद्रांतर्गत वाखारी उपकेंद्र येते. हयातनगरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाखारी येथे एक परिचारिका व एक आरोग्य कर्मचारी तैनात असल्याचे सांगितले. उपकेंद्रांतर्गत अन्य सात गावे येतात. म्हणून या कर्मचाऱ्यांना दररोज एका गावाचा दौरा करावा लागतो. त्यामुळे वाखारी येथेच चोवीस तास कर्मचारी हजर राहू शकत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. वाखारी येथे उपकेंद्रासाठी आठ दिवसांपूर्वीच परिचारिका बदलून दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र वाखारी उपकेंद्रातच कर्मचारी व वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने इतर गावात काय अवस्था असेल, हे स्पष्ट होते. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षानेच आरोग्य सेवेचा बोजवारा उडत आहे. (वार्ताहर)
वाखारीचे आरोग्य उपकेंद्र कुलूपबंद
By admin | Updated: July 19, 2014 00:46 IST