औरंगाबाद: बँड वाजविण्याची परवानगी मिळण्याबाबत शहर बँड असोसिएशनने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना विनंती केली. त्यानुसार अटी व शर्तीच्या अधिन राहून त्यांना परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
बँड पथकातील प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान सहा चौरस फूट या प्रमाणात अंतराची व्यवस्था करावी. पथकातील कलाकार व बँड पथक मालक व चालक यांनी सर्वांनी जवळच्या मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील, याबाबत खात्री करूनच प्रवेश द्यावा. पथकातील कलाकार व बँड पथक मालक व चालक यांनी सर्वांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहील. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळावे. बँड वाजविण्याचे साहित्य वेळोवेळी सोडियम हायपोक्लोराइडच्या द्रावणाने सॅनिटाइज करावे. वाद्यवृंदांची हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी. सर्दी, खोकला, ताप, श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्या व्यक्तीस पथकात प्रवेश देऊ नये. कलाकारांनी हँडग्लोजचा वापर करावा, तसेच मास्क, फेसकव्हर लावणे बंधनकारक राहील.