लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर गणवेशाचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, खाते काढण्यासाठी विविध जाचक अटीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होऊन महिना होत आला तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षीपर्यंत प्रतिविद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळत होते. यासाठीचा ४०० रुपयांचा निधीही शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा होत होता. अनेकवेळा शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्यामध्ये गणवेश घेण्यावरुन वादाचे प्रकार घडले होते. त्यामुळे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. जिंतूर तालुक्यामध्ये १२ हजार ३ मुली तर ४ हजार ६२४ मुले असे १६ हजार ६२७ विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ४०० रुपये या प्रमाणे तालुकास्तरावर निधी देण्यात आला. गणवेशाचा निधी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेमध्ये खाते काढावे लागणार आहे. या शिवाय गणवेश खरेदी केल्याची पावती जोडावी लागणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी अगोदर बँकेमध्ये खाते काढण्याचा निर्णय घेतला. परंतु, विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आईचेही संयुक्त खाते काढावे लागणार आहे. यानुसार पालक बँकेमध्ये खाते काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. परंतु, बँकांनी धनादेश पुस्तिका घ्यावयाची असल्यास खात्यावर तीन हजार रुपये भरावे लागणार असून चलन भरुन पैसे काढावयाचे असतील तर किमान खात्यावर एक हजार रुपये ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे गणवेशाचे ४०० रुपये काढल्यानंतर खात्यावर १ हजार रुपये कायमचे अडकून पडणार असल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये विद्यार्थी-पालक चकरा मारत आहेत. मात्र आठ-आठ दिवस गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गटशिक्षणाधिकारी रणखांब यांच्याशी या विषयी मोबाईलवरुन संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
गणवेशाची प्रतीक्षाच
By admin | Updated: July 10, 2017 00:05 IST