लातूर : लातूर शहरात पाणीटंचाईची ओरड आॅगस्ट महिन्यातही कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या लातूरकरांना दिलासा देण्यासाठी यावर्षी शहरातील काही भागांत विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. जवळपास दहा विंधन विहिरी घेण्यात आल्या असून, महिना लोटत आला तरी अद्याप बहुतांश विंधन विहिरींना पंपच बसले नसल्याने त्या विंधन विहिरी सध्या तरी शोभेच्या वस्तूच बनल्या आहेत.मूलभूत, पायाभूत सुविधा व नगरोत्थान योजनेतून विंधन विहीर घेण्यासाठी जवळपास २० नगरसेवकांनी मागणी केली होती. त्यानुसार विंधन विहीर, विद्युतपंप, पाण्याची टाकी उभारणे व अन्य खर्चांसाठी २ लाख ५० हजार रुपयांची मनपा प्रशासनाने तरतूद केली होती. शहरात किती ठिकाणी विंधन विहिरी घेण्यात आल्या, किती ठिकाणचे काम सुरू आहे, पाणीटंचाई असलेल्या प्रभागांची ओरड आदी बाबींची माहिती ठेवणाऱ्या पाणीपुरवठा विभागात विंधन विहिरींबाबत तोकडीच माहिती आहे. ज्या भागांत विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत, तेथील नागरिक पंप बसविण्याच्या मागणीसाठी मनपाकडे खेटे घालत आहेत. टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना विंधन विहिरींना लागलेल्या पाण्यामुळे सुखावलेल्या नागरिकांना महिना लोटला तरी अद्यापही दिलासा मिळालेला नाही. ज्या भागांत तीव्र पाणीटंचाई आहे, अशा भागांमध्ये मागणीप्रमाणे टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. लातूर मनपाच्या मालकीची दोन व भाडेतत्वावर लावण्यात आलेल्या १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. विंधन विहिरींना पाणी आहे. परंतु, पंप नसल्याने त्या बंद आहेत. (प्रतिनिधी)विंधन विहिरीच्या कामासंदर्भात दहा ठिकाणची आॅर्डर पाणीपुरवठा विभागाने काढली आहे. जवळपास दहा ठिकाणी विंधन विहिरीही घेण्यात आल्या आहेत. विद्युत कनेक्शनसाठी महावितरणला अर्ज दिला आहे. गरजेनुसार विंधन विहिरी घेण्याचे काम अजूनही सुरूच आहे. किती ठिकाणी पंप बसले, किती विंधन विहिरी घेण्यात आल्या, किती शिल्लक आहेत, याबाबतची माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख यादव यांनाही माहीत नसल्याचे स्वत: त्यांनीच ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विंधन विहिरींचे पंप वेटिंगवर !
By admin | Updated: August 9, 2014 00:38 IST