जालना : या जिल्ह्यात आॅगस्ट मध्यंतरापर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्याने लघू व मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यांतील पाणी पातळीत एक टक्का सुद्धा वाढ झाली नसल्याचे गंभीर चित्र आहे.दरम्यान, या जिल्ह्यातील आठही तालुके राज्य सरकारने टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केले खरे, परंतु त्याचा आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसह टंचाइग्रस्त गावांना कितपत फायदा होईल, अशी शंका व्यक्त होत आहे.या जिल्ह्यात या वर्षी पावसाळा लांबला. परिणामी खरिपाच्या पेरण्या सुद्धा खोळंबल्या. आता आॅगस्ट महिन्याचेही पंधरा दिवस उलटले आहेत. परंतु जोरदार पावसाचा पत्ता नाही. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी दोन दिवस भिज पाऊस झाला. त्या पाठोपाठ चार दिवस ढगाळ वातावरण पसरले होते. त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना मोठ्या उत्साहाने सुरुवात केली. दुर्दैवाने पुन्हा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या ६१ टक्क्यांवरच खोळंबल्या. त्या पेरण्या पुढे कशाबशा पूर्ण झाल्या. आता पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरीप पिकांबरोबर टंचाईचे संकटसुध्दा उभे राहिल, अशी चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प व ५७ लघुप्रकल्पांतील जलसाठ्यात १ टक्काही वाढ झाली नाही. जिल्ह्यातील कल्याण गिरजा या प्रकल्पात केवळ २.९८ टक्के पाणीसाठा आहे. कल्याण मध्यम प्रकल्प, धामणा मध्यम प्रकल्प व गल्हाटी मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. अप्पर दुधना प्रकल्प कोरडाठाक आहे. जुई प्रकल्पात केवळ ०.६१ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. सात मध्यम प्रकल्पात केवळ ४.४८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ५७ पैकी १७ लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. तर २३ प्रकल्पांतील पाणी पातळी जोत्याखाली आहे. जिल्ह्यात सात तालुक्यांत पावसाचे प्रमाण विषम आहे. परतूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस तर बाजूच्या मंठा तालुक्यात सर्वात कमी पाऊस आहे. आॅगस्ट मध्यंतरापर्यंत केवळ १०४. १५ मिलीमीटर एवढीच पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे हे प्रमाण वार्षिक टक्केवारीच्या तुलनेत केवळ १६.९८ टक्केच एवढे आहे. नेर, राजेवाडी, बरंजळा, प्रल्हादपूर, रेवलगाव वाडी, चिंचखेडा, मांडी, रोहिलागड,कानडगाव, भातखेडा, धनगरपिंपरी, लासूर, मानेपुरी, तळतोंडी व बामणी हे लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. वाकी, दरेगाव, जामवाडी, नीरखेडा तांडा, कुंभेफळ, सोमठाणा, पिंपळगाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव, टाका, पानेवाडी, तळेगाव, चिंचोली, मांदाळा, पोखरी, पिंपरखेडा, शिरपूर, सारवाडी, परतवाडी, नागतास, हातडी या लघू प्रकल्पांतील पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील जलसाठ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा
By admin | Updated: August 15, 2014 01:34 IST