औरंगाबाद : पंचायतराज समितीने शहानिशा न करताच शालेय पोषण आहारप्रकरणी मुख्याध्यापकाला दोषी ठरवले. हा धक्का सहन न झाल्यामुळे त्या मुख्याध्यापकाने शाळेतच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ऐन दिवाळीमध्ये घडलेला हा प्रकार सोशल नेटवर्कवरून क्षणात औरंगाबादपर्यंत पोहोचला आणि शिक्षक वर्ग सुन्न झाला. मयत विजय नकाशे या मुख्याध्यापकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्व संघटना सरसावल्या. त्यांनी व्हॉटस्अॅपवर आपापल्या ग्रुपला आर्थिक मदतीचे आवाहन केले. शिक्षकांनीही आवाहनाला प्रतिसाद देत लाखो रुपयांची मदत जमा केली. प्राथमिक शिक्षक समितीचे के. सी. गाडेकर, सुषमा राऊतमारे, दिलीप ढाकणे, विष्णू भंडारे, नितीन नवले, रंजित राठोड, संभाजी खंदारे, अंजुम पठाण आदींनी जिल्ह्यातील शिक्षकांवर तालुकानिहाय आर्थिक मदत जमा करण्याची जबाबदारी सोपवली. शिक्षक समितीने ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चा आटोपल्यानंतर शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी अमरावती जिल्ह्यात विजय नकाशे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून शिक्षक समितीतर्फे जवळपास १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. शिक्षक भारतीने या घटनेचा निषेध करून विजय नकाशेंना न्याय द्या आणि अशैक्षणिक ओझातून शिक्षकांना मुक्त करा, या मागणीसाठी २६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. प्रकाश दाणे, महेंद्र बारवाल, संतोष ताठे आदींनी शिक्षक भारतीच्या हॉटस्अॅप ग्रुपवर आवाहन केल्यानंतर संघटनेच्या सदस्य शिक्षकांनी १ लाख रुपये जमा केले आहेत. शिक्षक सेनेनेही लवकरच नकाशे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक सेनेचे स्थानिक नेते दीपक पवार, प्रभाकर पवार, सदानंद माडेवार, श्याम राजपूत आदींनी शिक्षकांना केलेल्या आवाहनानुसार मदतीचा ओघ वाढला असून, १ लाख रुपयांची मदत लवकरच सुपूर्द केली जाईल, असे माडेवार यांनी सांगितले. याशिवाय प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेतर्फेही जवळपास ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत नकाशे कुटुंबियास दिली जाणार असल्याचे मधुकर वालतुरे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, राजेश हिवाळे, प्रशांत हिवर्डे, अशोक डोळस यांनी कळविले आहे. तत्पूर्वी प्राथमिक शिक्षक समितीच्या विजय साळकर, शालिकराम खिस्ते यांच्या गटाने ११ लाख रुपयांची मदत नकाशे कुटुंबाच्या बँक खात्यावर जमा केली आहे.
वॅगन दुरुस्ती कारखाना भूमिपूजनाच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: November 16, 2015 00:22 IST