नांदेड : दिमाखदार विवाह सोहळ्याच्या जमान्यात सामाजिक परिस्थितीचे भान राखत वडार समाजातील तरुणांनी सामूहिक विवाह सोहळ्याची कास धरली आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून मुखेड शहरातील बजरंगनगरातील वडारवाड्यात १२ मे रोजी १० जोडपी विवाहबद्ध होत आहेत. एकीकडे विवाह सोहळ्यांतील लखलखाट आणि दुसरीकडे पित्याला आपल्या मुलीचे लग्न कसे होणार, अशी चिंता, हे चित्र बदलण्यासाठी वडार समाजातील युवक सरसावले आहेत. दोन वेळेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही गावोगावी भटकणारा वडार समाज परिवर्तनापासून कोसोदूर आहे. शिक्षणाचा अभाव, रुढी-परंपरांचे ओझे आणि पुन्हा मुलीचे लग्न या चिंतेत असणार्या समाजबांधवांना दिलासा देण्याचे काम जय बजरंग नवयुवक वर्गाने केले आहे. मारोती पवार, राजू कासले, बालाजी पवार, महादेव कासले, धोंडिबा कासले, बालाजी बाभळे, कैलास बाभळे, साहेबराव पवार, लक्ष्मण पवार, नागोराव बाभळे यांनी पुढाकार घेऊन या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. आर्थिक अडचण दूर व्हावी, वधू-वरांच्या कुटुंबीयांचा खर्च कमी व्हावा यासाठी कुठल्याही मदतीशिवाय वडार समाजातीलच युवकांनी स्वत:हून सोहळ्याचे नियोजन केले आहे. (प्रतिनिधी) कोणाला कर्ज काढावे लागू नये सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना सांगताना मारोती पवार हा तरुण म्हणाला, यापूर्वी रितीरिवाजाने लग्न करण्यासाठी काही वधुपित्याला कर्ज काढावे लागल्याची उदाहरणे आहेत. त्यांना कष्ट करुन पोट भरायचे की कर्ज फेडायचे? हा प्रश्न पडतो. त्यातून शेवटी जीवनयात्रा संपविण्यापर्यंतही प्रसंग घडले. त्यामुळे सामूहिक विवाहातून काटकसरीचा निर्णय घेण्यात आला.
वडार समाजातील नव्या पिढीची सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती
By admin | Updated: May 8, 2014 00:44 IST