हिंगोली : जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या वतीने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम २१ जून पासून सुरू झाला आहे. या कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नावे नोंदविणे तसेच नावे वगळणे आदी उपक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शनिवारी उपविभागीय अधिकारी खुदाबक्श तडवी यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी बीएलओंना मार्गदर्शन केले. २९ जूनपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. त्यानंतर त्यासंदर्भात आलेले दावे व हरकती १५ जुलैपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर उपलब्ध डाटाबेसचे अद्यावतीकरण २५ जुलैपर्यंत केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीची अंतीम मतदार यादी ३१ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. बीएलओ आज मतदान केंद्रांवरहिंगोली तालुक्यात मतदार नोंदणीसाठी २२ जून रोजी सर्व बीएलओ त्या-त्या मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. ज्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत, अशा मतदारांनी संबंधित मतदारांनी बीएलओंकडे फार्म नं. ६ सह कागदपत्रे दाखल करावेत. तसेच १ जानेवारी २०१४ रोजी १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनीही जन्म तारीख व रहिवासाच्या पुराव्यासह नाव नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरू
By admin | Updated: June 22, 2014 00:25 IST