लातूर : निवडणूक विभागाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान सुरू असून, गेल्या तीन वर्षांत सप्टेंबर ते आॅक्टोबर या दरम्यान अभियान राबविण्यात आले आहे. त्यात ३१ हजार ९९३ मतदार वाढले असून, ही टक्केवारी ०.८१ आहे. दरम्यान, १९१९ केंद्रांवर झालेल्या या मतदार नोंदणीकरिता एका वर्षासाठी ९५ लाख ९५ हजार रुपये असे एकूण तीन वर्षांसाठी २ कोटी ८७ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात ही मतदार नोंदणी प्रत्येकवर्षी सप्टेंबर ते आॅक्टोबर दरम्यान होते. यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले जाते. २३ सप्टेंबर २०१४ अखेरपर्यंत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या २ लाख ९३ हजार ५२९, लातूर शहर ३ लाख २९ हजार २०५, अहमदपूर २ लाख ८९ हजार ४३८, उदगीर २ लाख ७० हजार ८८२, निलंगा २ लाख ८४ हजार ६८९ आणि औसा २ लाख ५७ हजार ५३ अशी एकूण ६ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या १७ लाख २४ हजार ७९६ नोंदविण्यात आली होती. यावेळी एकूण ९६.१५ टक्के मतदार या मतदारसंघात होता. २०१४ साली झालेल्या निवडणुका या मतदारांच्या मतांवर झाल्या. त्यानंतर २०१४-१५ ते २०१६-१७ असे तीन वर्षे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. लातूर जिल्ह्यातील १ हजार ९१९ मतदार नोंदणी केंद्रावर या मतदारांची नोंदणी करण्यात आली. तीन वर्षांत ०.८१ टक्के मतदारांची वाढ झाल्याची आकडेवारी जिल्हा निवडणूक कार्यालयातून हाती आली आहे. २०१४ सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मतदारांच्या संख्येत यंदा २०१६ च्या नोंदणीमध्ये ३१ हजार ९९३ मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकाच वेळी ६ विधानसभा मतदारसंघातील १ हजार ९१९ नोंदणी केंद्रांवर ही नोंदणी केली जाते. एका नोंदणी केंद्रासाठी शासनाकडून ५ हजार रुपये खर्च केला जातो. एका वर्षासाठी ९५ लाख ९५ हजार असा खर्च करण्यात आला आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ३१ हजार ९९३ नव्या मतदारांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. (प्रतिनिधी)
मतदार नोंदणी; ३ कोटी खर्च
By admin | Updated: October 15, 2016 00:52 IST