जिंतूर : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाचा झेंडा लावून वाहन आणणे. विनापरवाना लाऊडस्पीकर लावणे या कारणावरून कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांच्या वाहनांवर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. जिंतूर-सेलू मतदारसंघात २५ सप्टेंबर रोजी कॉँग्रेसचे उमेदवार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक वाहनांद्वारे त्यांचे समर्थक जिंतुरात आले होते. आचारसंहिता पथकाचे जिंतूर शहरप्रमुख अविनाश सोपानराव चव्हाण, अभियंता नगर परिषद जिंतूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.एच. २२-११६६ या आॅटोवर व ईतर वाहनांवर विनापरवाना ध्वनीक्षेपक लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर २६ सप्टेंबर रोजी शिवसेनेचे उमेदवार राम कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या समर्थकांनी वाहनावर शिवसेना या पक्षाचे ध्वज लावले होते. एम.एच. २२ यु. १४९८ या व इतर वाहनांवर आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. २७ सप्टेंबर रोजी राकाँने अर्ज दाखल केला होता. एम.एच. २२ ए.ए. १८५४ या व इतर वाहनांवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा ध्वज असल्याने जिंतूर पोलिसात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे हे तीनही गुन्हे २९ सप्टेंबर रोजी दाखल झाले आहेत. (वार्ताहर)
वाहनांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे
By admin | Updated: October 1, 2014 00:33 IST