नळदुर्ग : किराणा दुकान फोडून मुद्देमाल घेऊन पळ काढण्याच्या प्रयत्नातील चोरटा पत्र्यावरून खाली पडल्याने ग्रामस्थांच्या तावडीत सापडला़ पोलिसांनी त्यास मुद्देमालासह अटक केली असून, या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळकोट (ता़तुळजापूर) येथे घडली़ पोलिसांनी सांगितले की, जळकोट येथे राष्ट्रीय महामार्गालगत नागनाथ महादेव मंगशेट्टी यांचे किराणा दुकान आहे़ राजकुमार मुबी (राख़ावीदपूर ता़निदनीपूर पश्चिम बंगाल) या इसमाने बुधवारी सकाळी बाहेरून त्यांच्या दुकानाची पाहणी करून काही साहित्य खरेदी केले होते़ रात्री दुकान बंद करून मंगशेट्टी हे घरी गेले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास मुबी याने दुकानाच्या पत्र्यावर चढून तो पत्रका कात्रीने कापून आत प्रवेश केला़ आतील गल्ल्यातील रोख १०२० रूपये, साबण, क्रीम, सिगारेट पॉकेट आदी ३१६७ रूपयांचा मुद्देमाल घेतला़ मुद्देमाल घेऊन तो परत पत्र्यावरून जात असताना तो खाली पडला़ ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास मुद्देमालासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी मंगशेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास हेकॉ घोडके हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी झालेल्या काही चोरी प्रकरणात अटकेतील इसमाचा हात आहे का याबाबत चौकशी सुरू आहे़ त्याच्याकडून इतर चोरी प्रकरणातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, तो परदेशी असावा, असा संशय सहायक पोलिस निरीक्षक डांगे यांनी व्यक्त केला़
ग्रामस्थांनी चोरास रंगेहाथ पकडले
By admin | Updated: May 24, 2014 01:42 IST