कोरोनामुळे लांबलेली यंदाची ग्रा.पं. निवडणूक अनेक कारणांमुळे सदैव लक्षात राहील.
बदललेल्या आरक्षणामुळे सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला तर इतरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. अनुसूचित जाती व जमातीसाठीचे पूर्वीचेच आरक्षण कायम ठेवण्याच्या निर्णयाने सरपंच निवडीची रंगत वाढली. गंगापूर तालुक्यातील वाळूज व जोगेश्वरी या तगड्या ग्रा.पं.मध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने चुरस वाढली आहे. वाळूजचे सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी तर जोगेश्वरी ना.मा. प्रवर्गातील सरपंच होणार आहे. यासाठी दोन्ही ठिकाणी दिग्गजांनी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आहे. शे.पु.रांजणगावात ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. अंबेलोहळ, जामगाव व गाजगावचीही परिस्थिती ‘जैसे थे’ असून, विशेष म्हणजे येथे एकाच गटाकडे बहुमत असल्याने सरपंच निवडीसाठी या ठिकाणी फारशी रस्सीखेच होणार नसल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण पदासाठी आरक्षण आलेल्या ग्रा.पं.मध्ये मात्र मोठी चुरस पहायला मिळणार आहे. तहसील प्रशासनाने सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून, ८ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत तालुक्यातील ७१ ग्रा.पं. सरपंच व उपसरपंच निवडीचे चित्र स्पष्ट होईल.