औरंगाबाद : मराठवाड्याचा शैलीदार डावखुरा फलंदाज विजय झोल याचे झंझावाती शतक आणि त्याने कर्णधार ऋषिकेश काळे याच्या साथीने केलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर जालना संघाने शिरपूर येथे एमसीएच्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या सी. एन. ए. संघाविरुद्ध ३४५ धावा ठोकल्या.या स्पर्धेत जळगावविरुद्ध ६२ आणि उस्मानाबादविरुद्ध ८९ धावांची सुरेख खेळी करणाऱ्या विजय झोल याने शिरपूर येथे मंगळवारी आपली तीच लय कायम ठेवताना सीएनएच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना चौफेर टोलेबाजी केली. त्याच्या या आक्रमक फलंदाजीच्या बळावर जालना संघाला पहिल्या डावात ३४५ अशी निर्णायक धावसंख्या उभारली. सुरुवातच टोलेजंग षटकार व तीन सणसणीत चौकाराने करणाºया विजय झोलने आपल्या आक्रमक फलंदाजीने आज शिरपूर येथील मैदान दणाणून सोडले. त्याने डोळ्यांचे पारणे फेडणारे ६ उत्तुंग षटकार ठोकले, तसेच खणखणीत कव्हर ड्राईव्ह, पूल, स्वीपच्या आकर्षक फटक्यांची उधळण करताना २२ चौकारांसह ११६ चेंडूंतच १३४ धावांची स्फोटक खेळी सजवली. या खेळीदरम्यान त्याने कर्णधार ऋषिकेश काळे याच्या साथीने शतकी भागीदारी केली. विजय झोलला साथ देणाºया ऋषिकेश काळेने १0 चौकार व एका षटकारासह ५९ धावांची आकर्षक खेळी केली. या दोघांशिवाय सलामीवीर हृषिकेश पांगारकरने ५ चौकारांसह ४0, रामेश्वर इंगळेने ३ षटकार व ४ चौकारांसह ३९ धावांचे योदान दिले. रामण्णा नंदागिरी व व्यंकटेश काणे यांनी प्रत्येकी १९ धावा केल्या. दिवसअखेर सीएनए संघाने ३ बाद ११३ धावा केल्या. सीएनएचे हे तिन्ही फलंदाज जालन्याचा डावखुरा वेगवान गोलंदाज शोएब सय्यद याने बाद केले.संक्षिप्त धावफलकजालना (पहिला डाव) ६६.१ षटकांत सर्वबाद ३४५.(विजय झोल १३४, ऋषिकेश काळे ५९, हृषिकेश पांगारकर ४0, रामेश्वर इंगळे ३९, रामण्णा नंदागिरी १९, व्यंकटेश काणे १९.)सीएनए (पहिला डाव) : ३ बाद ११३.
विजय झोलने ११६ चेंडूंत झोडपल्या १३४ धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:52 IST