जालना : लोकमत सखी मंचच्या वतीने बुधवारी शहरात आयोजित सखी महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा महोत्सव म्हणजे एक पर्वणीच ठरला. रांगोळीने सुरुवातयेथील खेरुडकर मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी १२ वाजता सखी महोत्सवास रांगोळी स्पर्धेने सुरुवात झाली. या रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या समुह रांगोळी स्पर्धेत चार बाय चार आकारामध्ये अनेक आकर्षक रंगीत बहारदार रांगोळी रेखाटून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत स्नेहा तळकरी, नम्रता चौधरी यांच्या समुहाने उत्कृष्ठ रांगोळीचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकावला. तर निता मुंदडा यांच्या समुहाने द्वितीय क्रमांक आणि अर्पणा ओव्हळकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.मेहंदी : यासोबतच मेहंदी या प्रकारात सहभागी सखींनी उपस्थित असलेल्या सखींच्या हातावर मेहंदीचे रेखाटन केले. यात बहुसंख्य स्पर्धकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीची कलाकृती सादर केली. स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाचे बक्षीस किर्ती कुलकर्णी, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सपना दायमा तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस पल्लवी गोफणे यांनी मिळविले.या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक सखींनी आपल्या आवडत्या पाक कृती या स्पर्धा प्रकारात हिरीरिने सहभाग घेत रुचकर पदार्थांचे सादरीकरण केले. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे बटाट्याचा तिखट पदार्थ घरुनच तयार करुन आणण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे स्पर्धकांनी बटाट्यापासून अनेक प्रकारची रुची असलेले मेनू सादर केले. या पाक कृती स्पर्धेचे विजेते असे : प्रथम- वर्षा खिस्ते, द्वितीय- अर्चना खिस्ते, तृतीय- अर्चना वायकोस.शेवटी ब्रायडल आणि फॅन्सी (प्रांतीक वेशभूषा) ही स्पर्धा पार पडली. ब्रायडल स्पर्धेत अनेक सखींनी नववधूची वेशभूषा करुन आपली नवरी होण्याची हौस भागविली व रॅम्पवॉकचा आनंद घेतला. यासोबतच परिक्षक व उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. या ब्रायडल मेकअप स्पर्धेत साधना भालेराव यांनी प्रथम, रुपाली म्हस्के यांनी द्वितीय तर डिम्पल डेम्बडा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शेवटी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रांतीक वेशभूषा हा विषय देण्यात आला होता. त्यात कोळीन, पंजाबी, पारधी, बंजारा महिलांचा पेहराव, अस्सल मराठमोळी वेशभूषा, स्वच्छतेचा संदेश देणारा दूत, सुया-पोत विकणाऱ्या महिलेची वेशभूषा करुन उपस्थित सखींची वाहवा मिळविली. आपल्यात असलेल्या कलागुणांचे दर्शन घडविले. या सखी महोत्सवासाठी परीक्षक म्हणून सुनीता मदन, शोभा इंगळे, अनुजा काला, मथुरा सुतार यांनी चोख भूमिका बजावली. सखी मंचच्या वतीने परिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सखी महोत्सवासाठी खेरुडकर मंंगल कार्यालयाचे रवींद्र देशपांडे, अनुराधा आमटे यांचे सहकार्य लाभले.
सखी महोत्सवातून घडले कलागुणांचे दर्शन
By admin | Updated: March 26, 2015 00:54 IST