लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रवासी म्हणून ट्रॅव्हल एजन्सीकडून अलिशान गाडी बुक करायची. प्रवासात चालकास विश्वासात घेऊन एसी सुरू ठेवयाला सांगायचे. संधी मिळताच गाडी घेऊन पोबारा करायचा, ही पद्धत वापरून एक-दोन नव्हे तब्बल १२ अलिशान गाड्या चोरणाºया आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.या संदर्भात गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. सय्यद शकील सय्यद युसूफ (रा. जवाहनगर, बुलडाणा), जाहेदखा चाँदखा व आयज खान समीन खान (दोघे, रा. नागपूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.या गुन्ह्यांचा मुख्य सूत्रधार सय्यद शकील आहे. येथील बदनापूर, मोजपुरी, व मंठा पोलीस ठाण्यात गत वर्षी व यंदा चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. गुन्हे शाखेने दोन पथकांमार्फत तपासाला सुरुवात केली. तपासात पोलिसांनी बुलडाणाहून सय्यद शकील यास २० जूनला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. शकीलने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने नागपूरमधील वरील दोघांना ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी सांगितले, की सय्यद शकील दोन वर्षांपासून मुंबई, पुणे येथून जालना, औरंगाबाद, बुलडाणा, नांदेड, जळगाव व अन्य ठिकाणी येण्यासाठी अलिशान इनोवा, तवेरा, इर्टिका या गाड्यांची आॅनलाइन बुकींग करायचा. प्रवासी म्हणून किरायाने घेतलेली गाडी जालना, जळगाव, बुलडाणा भागात आल्यानंतर चालकास विश्वासात घेऊन एसी चालू ठेवण्यास सांगायचा. लघुशंकेस जाण्याचा बहाणा करून चालकाकडे पैसे देऊन हॉटेल, धाब्यावरून पाण्याची बॉटल व अन्य साहित्य आणण्यास सांगायचा. चालक विरुद्ध दिशेने जाताच स्वत: गाडी घेऊन बुलडाणा येथे आणायचा.नागपुरातील दोन संशयितांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून चोरलेल्या गाड्यांची परराज्यांत विक्री करायचा. संशयितांकडून आतापर्यंत सात इनोवा, चार तवेरा, एक ईर्टिका अशा दीड कोटी रुपयांच्या बारा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर मोजपुरी, मंठा, बदनापूर, भोकरदनसह मुंबईच्या विविध ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे स्थानिक पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक एच.व्ही. वारे, सी.एस. घुसिंगे, शेख रज्जाक, हरीश राठोड, भालचंद्र गिरी, सॅम्युअल कांबळे, विष्णू चव्हाण, रंजित वैराळ, संजय मगरे, सचिन चौधरी, सदा राठोड, विलास चेके, हिरामण भलटणकर, निमा घनघाव आदींनी ही कारवाई केली.
वाहनचोर टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:33 IST