औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम नवीन बीड बायपास रोडच्या कामावर झाला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचए) अधिकाऱ्यांनी मजुरांना धीर देत उड्डाणपूल, अंडरपास, कॅटल पास (जनावरांना रस्ता ओलांडणारा मार्ग), पाणी वाहून जाण्यासाठीच्या चाऱ्या अशा लहान- मोठ्या १३९ पुलांची कामे सुरुच ठेवली आहेत. दरम्यान, हा मार्ग वाहतुकीसाठी ऑगस्ट अखेरपर्यंत खुला करण्याचे प्राधिकरणाचे नियोजन आहे.
निपाणी ते करोडी या ३० किलोमीटर लांबीच्या नवीन बायपास रोडचे काम फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरु झाले. लार्सन अँड टूब्रो (एल अँड टी) ही कंत्राटदार कंपनी या रस्त्याचे काम करत असून कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी आणि यंदा सलग दोनवेळा रस्त्याचे काम प्रभावित झाले. निविदेतील अटी व शर्तीनुसार कोणत्याही परिस्थितीत ऑगस्ट २०२१ अखेरपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दिशेने युद्धपातळीवर काम सुरु आहे.
अलीकडे वाढती वाहतूक आणि तुलनेने रस्त्याची कमतरता, यामुळे नवीन रस्ते तयार होणे ही काळाची गरज बनली होती. पूर्वी जालना रोड हा शहराच्या बाहेरचा रस्ता समजला जात होता. बघता बघता शहराचे वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे जालना रोड हा शहराचा मध्यवर्ती रस्ता बनला. या रस्त्यावरुन धावणारी जड वाहने तसेच बाहेरुन येणाऱ्या वाहनांसाठी बीड बायपास अस्तित्वात आला. आता या बायपासच्या दक्षिणेलाही मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आणि आता हा रस्ता देखील शहराचा मुख्य मार्ग बनला. या रस्त्यावरील जड वाहनांची गर्दी आणि होणाऱ्या अपघातांमुळे हा बायपास मृत्यूचा सापळा म्हणून कुख्यात झाला.
दोन वर्षांपूर्वी जुन्या बीड बायपासला पर्याय म्हणून सोलापूर- धुळे रस्त्यासाठी निपाणी ते करोडी या नवीन बीड बायपासच्या कामाला सुरुवात झाली. हा बायपास निपाणी, गांधेली, बाळापूर, देवळाई, सातारा, कांचनवाडी, वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, साजापूर आणि करोडी शिवारातून जात आहे. या रस्त्याचे काम आज घडीला सुमारे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. निपाणी ते करोडीपर्यंत ३० किलोमीटरच्या अंतरात या रस्त्यावर एक मोठा उड्डाणपूल, २९ लहान पूल, ८ व्हेईकल अंडरपास, १ व्हेईकल ओव्हरपास, पादचाऱ्यांसाठी ४ अंडरपास, जनावरांसाठी १ अंडरपास, पाणी वाहून जाण्यासाठी ९५ चाऱ्या व पाईपचे पूल असे एकूण लहान- मोठ्या १३९ पुलांची कामे सुरु आहेत. या रस्त्यावर ५१६ कोटी रुपयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे.
चौकट.......
लसीकरणासाठी स्थानिक प्रशासनाला प्रस्ताव
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ऑगस्ट अखेरपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे आमचे प्रयत्न आहेत; पण कोरोनाचा संसर्ग वाढत राहिला, तर दीर्घ स्वरुपाचा लॉकडाऊन लागेल, अशी भीती मजुरांमध्ये आहे. सध्या २५० मजूर या रस्त्यावर काम करीत असून २५ ते ३० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. मजुरांना साईटवरच लसीकरण करावे, याबाबत आम्ही स्थानिक प्रशासनाला प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्यायला तयार आहोत, असेही आम्ही कळविले आहे.