जालना: शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावत वरूणराजाने कृपा कायम ठेवली. तीन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने पिकांना जीवदान मिळण्यासोबतच जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्याचे चित्र आहे. तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. दिवस-रात्र पावसाची रिपरिप सुरूच होती. जालना तालुक्यासह सातही तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पिकांना जीवदान मिळाले असून, यंदा तरी समाधानकारक पीक येईल अशी आशा शेतऱ्यांना आहे. तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या यावर्षी काहीअंशी दिलासा मिळण्याची आशा आहे. जून महिन्यात पाऊस पडला नसला तरी जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लागत आहे. तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे नद्या, नाले, ओढे खळखळून वाहत आहेत. पेरणी केल्यावर योग्य पाऊस पडत असल्याने कापसासह सर्वच पिकांचे समाधानकारक उत्पादन निघणार आहे. जालना शहरासह अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर, बदनापूर, भोकरदन तालुक्यात समाधानकारक पाऊस कोसळत आहे. दिवसभर कधी जोरात कधी हलक्या सरी कायम आहेत.पावसामुळे ग्रामीण भागात शेती जलमय झाली आहे. सकल भागात पाणी साचले आहे. जालना शहरातही अनेक रस्ते व सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नदी, नाले ओसंडून वाहत आहे. जलयुक्तच्या कामांतही चांगला पाणीसाठा दिसून येतो. (प्रतिनिधी)
जिल्ह्यावर सलग तिसऱ्या दिवशीही वरुणराजाची कृपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 00:50 IST