औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये पर्यटन व्यवसायाला मोठा वाव आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उत्सव- महोत्सवांचे आयोजन करण्याचा संकल्प राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला आहे. आपल्या ‘व्हिजन औरंगाबाद’ या जाहीरनाम्यात राजेंद्र दर्डा यांनी पर्यटन विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील अजिंठा- वेरूळ या पर्यटनस्थळांसह शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ला आदी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी देश- विदेशातून पर्यटक येतात. या पर्यटकांना योग्य त्या सुविधा आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रम दिल्यास त्यांची संख्या वाढविणे शक्य होईल. त्यासाठी ‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये औरंगाबाद दर्शन बस सुरू करण्यापासून ते ऐतिहासिक स्थळांच्या सौंदर्यीकरणापर्यंत अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून झालेला विकास उल्लेखनीय आहे़ त्यामुळे देशी, तसेच परदेशी पर्यटकांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे़ राजेंद्र दर्डा हे पर्यटन राज्यमंत्री असताना त्यांनी १८७ कोटी रुपयांचा निधी अजिंठा आणि वेरूळच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला होता़ त्यामुळे आज या पर्यटनस्थळांनी जागतिक दर्जा प्राप्त केला आहे़ शहरातील कलाग्राम ही राजेंद्र दर्डा यांच्याच संकल्पनेतून साकारलेली एक अप्रतिम अशी वास्तू आहे, ज्यामुळे पर्यटन विकासासह स्थानिक कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यासोबतच त्यांनी शहरातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिल्याने औरंगाबादची पर्यटनस्थळे आकर्षण बनली आहेत. पर्यटकांच्या या आकर्षणाला पर्यटन विकासात परावर्तित करण्यासाठी ‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये मांडण्यात आलेल्या संकल्पना अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. पर्यटन विकासाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, शहराचे सौंदर्यीकरण आणि औरंगाबादला जागतिक ओळख निर्माण करून देण्याचा उद्देश समोर ठेवून हे व्हिजन बनविण्यात आल्याचे राजेंद्र दर्डा यांनी स्पष्ट केले. यासाठी औरंगाबादच्या नागरिकांनी सुचविलेल्या महत्त्वपूर्ण कल्पनांचा आधार घेतला असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.
पर्यटनवृद्धीसाठी विविध महोत्सव
By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST