उस्मानाबाद : दुष्काळामुळे हतबल झालेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पक्षीय मतभेद बाजुला ठेवून सर्वांनी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगत, विविध मागण्यांसाठी १४ सप्टेंबर रोजी आयोजित जेलभरो आंदोलनात जिल्हावासियांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सलग चार वर्षे अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कर्जबाजारी व आर्थिक संकटामुळे मागील आठ महिन्यात जिल्ह्यातील शंभरावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच अंबी येथे उपासमारीमुळे महिलेने आत्महत्या केली. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. १४ आॅगस्ट रोजी खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विविध मागण्या मांडून त्या मान्य नाही झाल्यास १४ सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी १ व २ सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत आढावा बैठक घेतली होती. परंतु, यानंतरही अद्याप कुठल्याच ठोस उपाययोजना आखण्यात आल्या नसल्याचा आरोप या प्रसिध्दीपत्रकात करण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर ७ सप्टेंबर रोजी प्रत्येक गावात जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता येथील राष्ट्रवादी भवनात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व शेतकऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
विविध मागण्यांसाठी १४ सप्टेंबरला ‘जेल भरो’
By admin | Updated: September 6, 2015 23:55 IST