औरंगाबाद : सिडको- हडको, गारखेडा आणि बीड बायपास, देवळाई, सातारा परिसरातील प्रवाशांसाठी मुकुंदवाडी रेल्वेस्थानक मुख्य रेल्वेस्थानकापेक्षा कमी अंतरावर आहे. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. परंतु सध्या हे रेल्वेस्थानक समस्येच्या गर्तेत सापडलेले आहे. त्याकडे रेल्वे प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे सोयी-सुविधांअभावी प्रवाशांना नाइलाजाने मुख्य रेल्वेस्थानक गाठण्याची वेळ येत आहे.औरंगाबाद शहराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्थानक सुरू केल्यानंतर परिसरातील प्रवाशांची सुविधा होईल आणि यामुळे प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात स्थानक सुरू करण्यात आल्यानंतर सोयी-सुविधांची देखभाल, दुरुस्ती आणि आवश्यक त्या नव्या सुविधा देण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे याठिकाणी दिसून येते. प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्थाही नसल्याचे दिसून येते. तिकीट घरात बाकडे टाकून प्रतीक्षालय बनविण्यात आले आहे. परंतु येथेही साफसफाई ठेवण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. रेल्वे येण्याच्या वेळेत तिकीट विक्री होते. तिकीट विक्री कक्षाला कुलूप राहिल्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे ऐनवेळी तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होते.आरक्षण सुविधा मिळावीजालना, बदनापूर, परभणी, सेलू, रोटेगाव आदी ठिकाणी नोकरीनिमित्त अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पाणी, स्वच्छतागृह यासह आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.थांबा देण्याची गरजमुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर केवळ पॅसेंजर गाड्या थांबतात. परंतु लांब पल्ल्याच्या, एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील प्रवाशांची सोय होईल. पर्यायाने मुख्य रेल्वेस्थानकावरील गर्दीचा भारही कमी होईल.मुख्य स्थानक गाठण्याची वेळस्थानकावर रेल्वे पोलिसांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे भुरट्या चोरांमुळे सिडको-हडको भागातील प्रवासी मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर रात्रीच्या वेळी उतरण्यास कचरतात. स्थानकातील असुविधांमुळे दिवसाही मुकुंदवाडी स्थानकावरून प्रवास सुरू करण्यापेक्षा मुख्य स्थानकावरून जाण्यास प्राधान्य दिले जाते.प्रवाशांची सुविधा होईलमुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर तिकीट विक्री कक्ष रेल्वे येण्याच्या वेळेतच सुरू असते. शिवाय याठिकाणी अनेक असुविधा आहेत. रस्ता, पाणी, लाईट आणि आरक्षण आदी सुविधा याठिकाणी दिल्या पाहिजेत. यामुळे परिसरातील प्रवाशांची सुविधा होईल. पर्यायाने मुख्य रेल्वेस्थानकातील भारही कमी होईल, असे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा म्हणाले.रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्तीरेल्वे प्रशासनाने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर स्वत:च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून बुकिंग, आरक्षणाची सुविधा केली पाहिजे. शिवाय याठिकाणी शेड उभारले पाहिजे. सुविधा उपलब्ध झाल्यास प्रवाशांचा मुख्य रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी वाहन, पार्किंगवर होणारा खर्च आणि वेळ वाचेल, असे मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले.
वर्दळीचे रेल्वेस्थानक समस्येच्या गर्तेत
By admin | Updated: August 31, 2014 00:43 IST