वरुड चक्रपान : सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथे १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा दुपारी १२ वाजता सरपंच काशिनाथ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तंटामुक्तीचे अध्यक्ष बदलण्यात यावे, अशी मागणी रघुजी सोनटक्के यांनी केली असता त्यांना जवळपास तिनशे गावकऱ्यांनी विरोध केला. सर्वानुमते सहा वर्षांपासून असलेले अध्यक्ष प्रल्हादराव आदमाने यांना कायम ठेवावे, या ठरावास ग्रामसभेने मंजुरी दिल्याने त्यांना अध्यक्ष केल्याचे ग्रामसेवक अरुण वाबळे यांनी जाहीर केले. दहा दिवसांपासून रोहीत्र जळाल्याने पाण्यासाठी हाल होत असल्याने ते चार- पाच दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन सरपंच काशिनाथ मानकर यांनी दिले. दारुबंदी, पत्त्यांचे क्लब बंद करणे, १०० टक्के करवसूली, ग्रामसभेला ग्रा.पं. सदस्य उपस्थित, तलाठी व आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नसल्याबद्दल चर्चा, पांदण रस्ते मोकळे करणे, कामय स्वरुपी ग्रामसेवक व लाईनमन देणे, नवीन जॉबकार्ड तयार करणे, अतिक्रमित नाल्या मोकळ्या करणे आदी विषयांनी सभा गाजली. यावेळी उपसरपंच त्र्यंबक आदमाने, केशव कोटकर, विश्वनाथ आदमाने, रामजी गवळी, श्रीकांत कोटकर, महादुआप्पा राऊत, ज्ञानबा कोटकर, ग्रामविकास अधिकारी अरुण वाबळे, मधुकर मगर, प्रल्हादराव आदमाने आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
वरुड चक्रपानची ग्रामसभा गाजली
By admin | Updated: August 17, 2014 00:31 IST