लातूर : राज्य शासनाकडे मागणी करूनही मागील चार वर्षांपासून व्हेंटीलेटरचा पुरवठा होत नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात जुन्या व्हेंटीलेटरवरच कामकाज चालवावे लागत आहे. सध्या रुग्णालयात असलेले जीवनप्रणाली यंत्रच आजारी आहेत. त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडे जावे लागत आहे. सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जे व्हेंटीलेटर होते तेच व्हेंटीलेटर अद्यापही कार्यान्वित आहेत़ हे सर्व व्हेंटीलेटर १० ते १५ वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे ते बंद पडतात. कंपन्याही मुंबई, पुणे, मद्रास येथील असल्याने दुरुस्तीसाठी तंत्रज्ञही तेथूनच येतात़ यामुळे मागील दोन महिन्यांपासून अतिदक्षता विभागातील अनेक व्हेंटीलेटर सतत बंद पडत आहेत़ आॅक्टोबर महिन्यात तर केवळ दोनच व्हेंटिलेटरवर अतिदक्षता विभाग सुरु होता़ यामध्ये तिसरा रुग्ण गंभीर अवस्थेत झाल्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागत होती़ सर्वोपचार रुग्णालयातील प्रशासनाने बंद पडलेले व्हेंटिलेटर सुरु केल्याने सद्य:स्थितीत ७ व्हेंटिलेटर सुरु आहेत़ अद्यापही दोन व्हेंटिलेटर बंदच आहेत़ चालू व्हेंटिलेटर केव्हा बंद पडेल याची खात्री नाही़ त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून वैद्यकीय शिक्षण संचालकाकडे ७ नवीन व्हेंटीलेटरचा प्रस्ताव पाठविला आहे. गेल्या चार वर्षांपासून सतत प्रस्ताव पाठविले जातात़ मात्र व्हेंटिलेटर मिळत नाहीत़ त्यामुळे अतिदक्षता विभागाला जुन्या व्हेंटिलेटरवरच रुग्ण सेवा द्यावी लागत आहे़ (प्रतिनिधी)
व्हेंटीलेटरचा पुरवठा होईना !
By admin | Updated: November 8, 2015 23:38 IST