औरंगाबाद : घाटी रुग्णालय आसपासच्या गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असल्याचे अनेक घटनांतून समोर आले आहे. बुधवारी गरजू व गरीब रुग्णांच्या मदतीच्या हाकेला साथ देत घाटीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदत जमा करून रुग्ण व नातेवाईकांना अकोला जिल्ह्यातील गावी रवाना केले. औषधींसह घरी सोडण्याची व्यवस्था करून कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
घाटीच्या सर्जरी विभागाच्या वाॅर्ड १७ मध्ये अर्जुन शिंदे या गरजू व गरीब रुग्णावर उपचार पूर्ण झाले. रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर त्याला त्यांच्या गावी कोठारीगाव (ता. पातूर, जि. अकोला) येथे जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी अधिष्ठाता कार्यालयातील रवी लोखंडे, रवी बैरागी या कर्मचाऱ्यांना परिस्थिती सांगितली. या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर्मचारी सहकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना गरजूला मदतीचे आवाहन केले. जमलेल्या पैशांतून औषधी घेऊन देत उरलेल्या पैशातून केवळ डिझेलच्या खर्चावर रुग्णवाहिकेने त्यांना गावी जाण्याची व्यवस्था करून दिली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांच्या मार्गदर्शनात समाजसेवा अधीक्षक सत्यजित गायसमुद्रे, लक्ष्मीकांत शिंगोटे, नरेंद्र भालेराव यांनी रुग्णाचे पुनर्वसन, समन्वय व मदतीसाठी पुढाकार घेतला.