उदगीर : स्वच्छतेच्या बाबतीत उदगीर नगर परिषदेची दक्षता वाखाणण्याजोगी आहे़ अगदी २४ तास सफाईचे काम चालते़ परंतु, गेल्या काही दिवसांपासून नागरी वस्त्यांमधील नालेसफाईकडे मात्र काहिसे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे़ मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामात दिरंगाई झाल्याने शहराच्या बऱ्याच वस्त्यांमध्ये नाल्या तुंबल्या आहेत़उदगीर नगरपरिषदेने शहर स्वच्छतेचा पॅटर्न निर्माण केला आहे़ त्यामुळेच शहरात कचरा आढळून येत नाही़ परंतु, नालेसफाईच्या बाबतीत मात्र पालिका काहिशी मागे पडली आहे़ शहरातील प्रमुख रस्त्यांच्या शेजारील नाल्या वरचेवर साफ केल्या जातात़ मात्र, नागरी वस्त्यांमधील नाल्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे़ मागासलेल्या भागात तर महिनोमहिने नाल्या उपसल्या जात नाहीत़ तीच गत आता इतरही वस्त्यांची होवू लागली आहे़ मिनी उद्योग भवनच्या पाठीमागील वस्तीत नाल्यांमध्ये गटारीचे पाणी तुंबून राहिले आहे़ बाजार समिती आवारातही नाल्यांची वाईट अवस्था आहे़ येथील नाल्या तुडूंब भरल्याने एखाद्या पावसानेही गटाराचे घाण पाणी रस्त्यावर अन् अगदी दुकानांमध्येही जाण्याची भिती आहे़ (वार्ताहर)
उदगीरातील वस्त्यांमध्ये नाल्या तुंबलेल्याच
By admin | Updated: June 23, 2016 01:14 IST