औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत २८ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या संशोधनपूर्व परीक्षेचा (पेट) निकाल उद्या जाहीर होणार असून, आज मंगळवारी या परीक्षेची ‘अन्सर की’ अपलोड करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पेटचा निकाल १० दिवसांत जाहीर करण्याची ग्वाही विद्यापीठ परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार दहाव्या दिवशी परीक्षा विभागाने पेटची ‘अन्सर की’ वेबसाईटवर टाकली असून, उद्या बुधवारी निकाल जाहीर केला जाणार आहे. यापुढे दर सहा महिन्यांनी ‘पेट’ घेतली जाणार आहे. पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यापुढे मार्गदर्शकांची कमतरता भासणार नाही. त्यासाठी देशातील ख्यातनाम संस्थांमधील तज्ज्ञांना निमंत्रित केले जाणार असून, त्यांना २ विद्यार्थ्यांना संशोधनाबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले की, जम्मू- काश्मीर पूरग्रस्तांना विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे मूळ वेतन देण्याचे कबूल केले होते. शिवाय विद्यापीठ आपत्कालीन निधीचे व्याज, असे मिळून १५ लाख रुपये पंतप्रधान साहाय्यता निधी म्हणून उद्या राज्यपालांकडे सुपूर्द केला जाणार आहे. लवकरच विद्यापीठातील सर्व विभाग व विद्यापीठ संलग्नित अनुदानित ११४ महाविद्यालयांचे ‘अकॅडेमिक आॅडिट’ केले जाणार आहे. या माध्यमातून विभाग व महाविद्यालयांच्या चांगल्या व कमकुवत बाजूंचे लेखा परीक्षण होईल. या माध्यमातून कमकुवत बाजू सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यापीठ स्थापनेनंतर पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे. यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. यामध्ये महाविद्यालयांशी संबंधित कोणाचाही समित्यांमध्ये समावेश नसेल.
विद्यापीठाच्या ‘पेट’चा आज निकाल लागणार
By admin | Updated: October 8, 2014 01:03 IST