पाचोड : थेरगाव शिवारातील चोरमारे वस्तीवर १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. पूजा राम चोरमारे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
थेरगाव शिवारातील चोरमारे शेतवस्तीवर राम चोरमारे यांचे कुटुंब राहते. त्यांची मुलगी पूजा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आपल्या शेतातीत विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली. विहिरीतून पाणी शेंदत असताना तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. तिला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पूजा ही पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात बी. ए. चे शिक्षण घेत होती. तीन दिवसांपूर्वीच भावाचे लग्न झाले. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना शनिवारी या दुर्दैवी घटनेने शोककळा पसरली.
सकाळी विहिरीवर पाणी काढायला गेलेली पूजा घरी का आली नाही? इतका उशीर कसा लागला म्हणून घरातील सर्व मंडळी तिला शोधण्यासाठी विहिरीजवळ आले. त्यांना विहिरीवर फक्त पाण्याचे भांडे दिसले. पण पूजा दिसली नाही. घरातील काही लोकांना शंका आल्याने त्यांनी विहिरीत उड्या मारल्या. तेव्हा पूजा विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. पाचोड पोलिसांना माहिती दिली गेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे , पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलीस जमादार किशोर शिंदे, फिरोज बरडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावातील तरुणांनी विहिरीत उड्या मारल्या. पूजाचा मृतदेह बाजेच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. पाचोड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस जमादार किशोर शिंदे हे करीत आहेत.
फोटो :
030421\anil mehetre_img-20210403-wa0011_1.jpg
पूजा चोरमारे हीचे विहीरीत बुडून मृत्यू