हिंगोली : जातपात, भाषा व प्रांत मतभेद विसरून प्रत्येकाने बाबासाहेबांना व संविधानाला समजून घेणे काळाची गरज आहे. त्याशिवाय देशातील विषमता नष्ट होणार नसल्याचे आॅल इंडिया समता सैनिक दलाचे प्रमुख मार्गदर्शक एल. आर. बाली यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. बाली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत काम केलेले असून जवळपास २०० च्यावर विविध पुस्तके लिहिली आहेत. डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची धुरा आजही वयाच्या ८६ व्या वर्षी बाली न थकता मोठ्या उत्साहाने देशभर फिरून सांभाळत आहेत. बाली म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला एका ठरावीक प्रांत किंवा जातीची ओळख कधीच दाखविली नाही. ते म्हणत मी प्रथम भारतीय आहे. बाबासाहेबांनी नेहमीच देशभक्तीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच देशभक्त असल्याची भावना जपायला हवी. प्रत्येक नागरिकांनी तसेच तरूणाईने बाबासाहेबांचे विचार अंगीकारणे आवश्यक असून त्यांचा वसा जपण्याचे काम करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समाजाची निर्मितीचे काम व त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. ते म्हणाले, कुठल्याही समाजाने जाती-उपजातीमध्ये गुरफटून राहू नये. चळवळीविषयी त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीची सध्या लोकांनी दुकानदारी मांडली आहे. अशा लोकांना धडा शिकविण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या संविधानाची चोख अंमलबजावणी झाल्यास देशात शांतता टिकून राहील. परंतु असे होताना मात्र दिसून येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
बाबासाहेबांचे विचार समजून घ्या -बाली
By admin | Updated: March 19, 2016 20:16 IST