विजय मुंडे , उस्मानाबाद महिला-युवतींवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी गृहविभागाकडून सुरू करण्यात आलेल्या १०३ या टोलफ्री क्रमांकावर सोमवारी, मंगळवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही़ तर वरील उद्देशाने गृहविभागाकडून सुरू करण्यात आलेल्या १०९१ या टोलफ्री क्रमांकावर मागील आठ महिन्यात केवळ ११ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत़ विशेषत: या दोन्ही टोलफ्री क्रमांकाची माहिती अनेक महिला, युवतींना नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टींग आॅपरेशन मधून समोर आला़ महिला-युवतींवरील वाढते अत्याचार, होणारी छेडछाड रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यासह टोलफ्री क्रमांक सुरू करण्याचे काम गृहविभागाने केले आहे़ १०३ हा टोलफ्री क्रमांक त्याचाच एक भाग ! मात्र, या टोलफ्री क्रमांकावर सोमवारी, मंगळवारी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही़ तर गृहविभागाने सुरू केलेला दुसरा टोलफ्री क्रमांक १०९१ वर संपर्क साधला असता उस्मानाबाद येथील जिल्हा पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्याने फोन रिसिव्ह केला़ या १०९१ क्रमांकावर एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत केवळ ११ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत़ बोगस कॉल येत नसले तरी हा टोलफ्री क्रमांक सुरू आहे का हे पाहण्यासाठी कॉल आल्याची एक नोंदही पोलीस मुख्यालयातील रजिस्टरवर करण्यात आली आहे़ येणाऱ्या कॉल्सच्या नोंदी घेण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे़ या क्रमांकावर एप्रिल महिन्यात २, मे महिन्यात चार, जून महिन्यात ३, जुलै महिन्यात २, आॅगस्ट महिन्यात शून्य, सप्टेंबर महिन्यात २ तर नोव्हेंबर महिन्यात आजवर केवळ १ तक्रार नोंदविण्यात आली आहे़ तक्रारीचे स्वरूप पाहून तक्रारदाराला मार्गदर्शन करून संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले असून, तेथील अधिकाऱ्यांनाही दाखल तक्रारीचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ शिवाय तक्रार गंभीर स्वरूपाची असेल तर तत्काळ संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी रवाना करण्यात येतात़ शहरी, ग्रामीण भागात पथके याबाबत अपर पोलीस अधीक्षक डॉ़ दिपाली घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, जिल्हा पोलीस दलांतर्गत येणाऱ्या १७ पोलीस ठाण्यांतर्गत छेडछाड विरोधी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे़ पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, माझा स्वत:चा मोबाईल क्रमांक शाळा- महाविद्यालयांना देण्यात आला असून, वेळोवेळी बैठकाही घेण्यात येत आहेत़ शिवाय व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, याचाही महिला-मुलींना लाभ होत आहे़ सर्व पथकाकडून जिल्ह्यात कारवाई सुरू असून, १०३ टोलफ्री क्रमांक हा मुंबईसाठी असून, जिल्ह्यासाठी असलेल्या टोलफ्री क्रमांक १०९१ वर येणाऱ्या तक्रारींचाही निपटारा वेळेत करण्यात येतो़
महिला-युवती हेल्पलाईनबाबत अनभिज्ञ
By admin | Updated: November 25, 2015 00:19 IST