औरंगाबाद : आइस्क्रीम घेऊन देण्याचे आमिष दाखवून एका ३० ते ३५ वयाच्या एका नराधमाने ६ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिडकोतील जयभवानीनगर येथे घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जयभवानीनगर येथील रहिवासी ६ वर्षीय बालिका ही ११ रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास तिच्या घरासमोर खेळत होती. यावेळी ३० ते ३५ वर्षाच्या एका नराधमाने तिला आइस्क्रीम खायचे का, असे विचारले. त्याने जयभवानीनगर येथील एका पुतळ्याजवळील रिकाम्या आणि पडक्या घरात तिला नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी तिच्यासह मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत. पीडित बालिकेने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी त्या नराधमाचा शोध सुरू केला आहे.
अनोळखी नराधमाचा बालिकेवर बलात्कार
By admin | Updated: February 14, 2015 00:12 IST