कळमनुरी : जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक एन.अंबिका या रूजू होताच फोफावलेल्या अवैध वाहतुकीस त्यांनी चांगलाच लगाम लावला आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कळमनुरी आगाराचे उत्पन्न २० टक्क्यांनी वाढले आहे. मागील ३ आॅगस्टपासून अवैध वाहतुक थांबली आहे. स्थानिक पोलिसही अवैध वाहतुकीच्या वाहनांवरही कारवाई करत आहेत. त्यामुळे अवैध वाहतुकीला पूर्णपणे आळा बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कळमनुरी आगाराचे उत्पन्न चांगलेच वाढले आहे. ४ आॅगस्ट रोजी आगाराचे भारमान ६६.४० टक्के होते. दर दिवशी आगाराचे ६० ते ७० हजारांच्या जवळपास येत आहे. आगारात ३८ बसेस असून चालक ७८ व वाहक ७२ आहेत. या आगारात १२ ते १५ चालक वाहकांची गरज आहे. वाहतुक नियंत्रक व लिपिकाची पदे रिक्त असल्याने चालक-वाहक त्यांची कामे करीत आहेत. बसेस जुन्या व खिळखिळ्या झाल्याने भंगार अवस्थेत आहेत. सध्या २ ते ३ बसेसला डिझेलचे अॅव्हरेज येत नाही. लांब पल्ल्याच्या बसेस चालविण्यासाठी आगाराला नवीन २० बसेसची आवश्यकता आहे; परंतु आगारात ३ बसेसच लांब पल्ल्याच्या प्रवासाला नेण्यासाठी उपलब्ध आहेत. २ लाख कि. मी. च्या आत चाललेल्या बसेस लांब पल्ल्यासाठी चालतात. परंतु येथे तशा ३ बसेसच उपलब्ध आहेत त्यामुळे कळमनुरी येथील आगाराला बसेसची आवश्यकता आहे. लांब पल्ल्याच्या बसगाड्याचे भारमान ८० ते ९० टक्के येते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेस सोडणे आगाराला गरजेचे आहे. आता आगाराचे उत्पन्न वाढल्याने प्रवाशांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करून उत्पन्न वाढीसाठी आगार प्रमुख रहीम सिद्दीकी, एन. एल. चौधरी, अकबर पठाण, डी. एम. कल्याणकर, शेख सलीमोद्दीन यांच्यासह चालक -वाहक कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)
अवैैध वाहतूक बंद; बसचे उत्पन्न वाढले
By admin | Updated: August 18, 2014 00:31 IST